15 उमेदवार सीआयडीच्या रडारवर

केपीएससी पशुवैद्यकीय भरती घोटाळ्यात खळबळजनक माहिती
त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या (केपीएससी) पशुवैद्यकीय पदांच्या भरतीतील कथित घोटाळ्याच्या तपासात दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी आयएएस अधिकारी ज्ञानेंद्र कुमार आणि कथित मुख्य सूत्रधार बसवराज कन्नाळे यांच्या संपर्कातील तब्बल 15 उमेदवारांची नावे सीआयडीच्या तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, बसवराज कन्नाळे याच्यामार्फत कथितरित्या प्रश्नपत्रिका मिळवलेल्या या 15 उमेदवारांनी सीआयडी चौकशीदरम्यान आपली भूमिका आणि भरती प्रक्रियेत सहभागाबाबत माहिती दिली आहे. परीक्षेपूर्वीच कन्नाळेच्या नेतृत्वाखालील कथित नेटवर्कमार्फत उमेदवारांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवण्यात आली होती, असा तपास यंत्रणेला संशय आहे. चौकशीला सामोरे जाणाऱ्या उमेदवारांनी आपण या संपूर्ण प्रक्रियेत कोणत्या प्रकारे सहभागी झालो आणि कथित गैरप्रकारात कशी भूमिका बजावली, याबाबत तपास अधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवल्याचे समजते.
पैशांच्या व्यवहाराचीही चौकशी
उमेदवारांकडून मध्यस्थांना पैसे कधी देण्यात आले, कोणत्या पद्धतीने पैसे अदा करण्यात आले तसेच नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात कोणती आश्वासने देण्यात आली होती, याची माहिती सीआयडी घेत आहे. प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी पैसे देण्यात आले होते का? पैसे दिले असल्यास ते कोणाला आणि कोणत्या माध्यमातून पाठवण्यात आले? उमेदवारांना नियुक्तीबाबत नेमकी कोणती आश्वासने देण्यात आली होती? या प्रश्नांवर आता सीआयडीचा तपास केंद्रित झाला आहे. उमेदवारांनी दिलेले जबाब तपासण्यासाठी त्यांच्या बँक खात्यांतील व्यवहार, ऑनलाईन पैशांचे हस्तांतरण, मोबाईल कॉल रेकॉर्ड तसेच अन्य डिजिटल पुरावे तपासले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Source link



