Uncategorized

मालवणात घरेलू कामगारांच्या भांडी संचासाठी ऑनलाईन नोंदणी; २३५ पात्र कामगारांची नोंदणी पूर्ण

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना संसारोपयोगी भांडी संच देण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात मालवण तालुक्यातील 235 पात्र घरेलू कामगारांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित कामगारांना पावत्यांचे वितरण नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगरसेवक ललित चव्हाण, भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव हरी चव्हाण, जिल्हा सचिव हेमंतकुमार परब, सीमा धुरी, भाग्यश्री माळकर, कल्पिता जोशी तसेच भांडी संच वाटप करणाऱ्या ठेकेदार एजन्सीचे कर्मचारी प्रवीण जाधव, रवी कदम, स्वाती आणावकर आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र घरेलू कामगारांना संसारोपयोगी भांडी संचाचा लाभ मिळावा, यासाठी भारतीय मजदूर संघाने सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. संघटनेच्या मागणीनंतर तसेच आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. जिल्ह्यातील एकूण 916 पात्र घरेलू कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सचिव हेमंतकुमार परब यांनी दिली.

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने सन 2024 मध्ये आदेश काढून 31 जुलै 2024 पूर्वी नोंदणी झालेल्या पात्र घरेलू कामगारांना संसारोपयोगी भांडी संच देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये भांडी संचाचे वाटप करण्यात आले. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 916 पात्र कामगारांना या योजनेचा लाभ मिळण्यास विलंब होत होता.

या प्रश्नाबाबत भारतीय मजदूर संघाने कामगार मंत्री आकाश फुंडकर, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर सिंधुदुर्गमधील पात्र घरेलू कामगारांना भांडी संच देण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली.

त्यानंतर भारतीय मजदूर संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सरकारी कामगार अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे पात्र कामगारांची ऑनलाईन नोंदणी तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, कार्यवाहीस विलंब होत असल्याने संघटनेने 8 सप्टेंबर 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन व निदर्शने करण्याचा इशारा दिला होता.

या पार्श्वभूमीवर जिल्हा कामगार अधिकाऱ्यांनी भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून पात्र घरेलू कामगारांसाठी भांडी संचाच्या ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र घरेलू कामगारांना संसारोपयोगी भांडी संचाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​