कोल्हापूरमधील चंदगडच्या मातीत सापडली नवी ओळख; पश्चिम घाटाच्या जैवविविधतेत नव्या ‘देवगांडूळ’ प्रजातीची भर

चंदगड ( कोल्हापूर) : चंदगड परिसराच्या समृद्ध जैवविविधतेला आता जागतिक वैज्ञानिक नोंदीत नवी ओळख मिळाली आहे. हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. एन. सी. हिरगोंड आणि त्यांचे संशोधक विद्यार्थी राहुल पाटील यांनी चंदगड परिसरातील बुझवडे गावातून देवगांडूळ समूहातील नव्या प्रजातीचा शोध लावला आहे.
या संशोधनाने चंदगड तालुक्याची जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झालेली दिसते. प्रा. डॉ. एन. सी. हिरगोंड आणि संशोधक राहुल पाटील यांनी आपल्या संशोधनातून चंदगड येथील बुझवडे येथे नव्या देवगांडुळप्रजातीचा शोध लावला आहे. या संशोधनासाठी झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया पुणे येथील डॉ. के. पी. दिनेश आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठातील डॉ. एन. पी. ग्रामपुरोहित यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या नव्या प्रजातीचे शास्त्रीय वर्णन रेकॉर्डस ऑफ द झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. देवगांडूळ हे पाय नसलेले, प्रामुख्याने जमिनीखाली किंवा मातीत वास्तव्य करणारे आणि अत्यंत गुप्त जीवनशैली असलेले उभयचर प्राणी आहेत. त्यामुळे त्यांचा शोध व शास्त्रीय अभ्यास तुलनेने आव्हानात्मक मानला जातो. याला या संशोधनात ‘गिगीनिओफिस चंदगडी” या नावाने संबोधले गेले आहे.
या देवगांडूळ प्रजातीच्या शोधामुळे उत्तर पश्चिम घाटातील उभयचर जैवविविधतेच्या अभ्यासाला नवी दिशा मिळणार असून, वर्गीकरणशास्त्र, उत्क्रांती, जैवभौगोलिक अभ्यास आणि जैवविविधता संवर्धनासाठी या नोंदीचे विशेष महत्त्व आहे. या प्रजातीच्या नावातील चंदगडी हा उल्लेख चंदगडच्या स्थानिक भाषिक व सांस्कृतिक ओळखीचा सन्मान करणारा आहे. या संशोधनासाठी सीसीएफ कोल्हापूर तसेच चंदगड वन विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या उल्लेखनीय संशोधनाबद्दल संशोधकांचे कौतुक व अभिनंदन दौलत विश्वस्थ संस्थेचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्य डॉ. आय. आर. जरळी यांनी केले.
Source link



