वारंवार गैरहजर अधिकार्यांमुळे लेखा समिती बैठकीवर बहिष्कार

संबंधितांवर कारवाई करावी यासाठी सरकारकडे तक्रार करण्याचा ठराव
बेळगाव : स्थायी समितीच्या बैठकीला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावून देखील त्यांच्याकडून उत्तर दिले जात नाही. वारंवार तेच अधिकारी बैठकीला गैरहजर राहात आहेत, बेजबाबदार अधिकाऱ्यांनी एकंदरीत चेष्टा चालविली आहे. त्यामुळे कौन्सिल सेक्रेटरींनी दिलेल्या नोटिसीला उत्तर न देणे, पुन्हा मिटिंगला गैरहजर राहणे असे प्रकार वाढले असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी नगरविकास खाते आणि प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार करण्याचा ठराव पास करण्यात आला. त्यानंतर अध्यक्ष व सदस्यांनी शुक्रवारच्या लेखा स्थायी समिती बैठकीवर बहिष्कार टाकून सभात्याग केला.
शुक्रवारी स्थायी समिती सभागृहात नंदू मिरजकर यांच्या अध्यक्षतेखाली लेखा स्थायी समितीच्या बैठकीचे आयोज केले होते. कौन्सिल विभागाकडून बैठकीची वेळ सकाळी 11.30 वाजता निश्चित केली होती. याबाबतची नोटीस अध्यक्ष, सदस्य आणि सर्व विभागाच्या प्रमुखांना आधीच पाठविण्यात आली होती. मात्र साडेबारा वाजले तरीही बहुतांश अधिकारी सभागृहात हजर झाले नाहीत. काही मोजकेच अधिकारी बैठकीला हजर होते. त्यामुळे गैरहजर अधिकाऱ्यांच्या प्रश्नावरून अध्यक्ष व सदस्य यांनी संताप व्यक्त केला.
कोणत्या विभागाचे अधिकारी गैरहजर आहेत? नोटीस पाठवून देखील ते बैठकीला गैरहजर का राहात आहेत, त्यांना पुन्हा फोनवरून संपर्क साधायला हवा का? बेजबाबदार अधिकाऱ्यांकडून प्रत्येकवेळी चेष्टा चालविण्यात आली आहे. मनपा आयुक्त काय काम करीत आहेत? त्यांचे लक्ष आहे की नाही, प्रशासकीय कामकाज ते कसे काय चालवित आहेत? यापूर्वीच्या बैठकीला गैरहजर असलेल्या कोणत्या व किती अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे, याची माहिती द्यावी, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर 9 अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली असून कोणीही नोटिसीला उत्तर दिले नसल्याचे कौन्सिल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
कायदेशीर कारवाईची मागणी
नोटीस देऊनही पुन्हा संबंधित अधिकारी गैरहजर राहात आहेत. विभागप्रमुख बैठकिला उपस्थित राहणार नसतील तर त्यांनी किमान दुसऱ्या अधिकाऱ्याला तरी पाठवायला हवे. अनेकवेळा सूचना करूनदेखील वेळोवेळी अशाच प्रकाराची पुनरावृत्ती का होत आहे, अधिकारी मनमानी करीत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांविरोधात सरकारकडे तक्रार करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी अध्यक्षांकडे केली. त्यामुळे अध्यक्ष नंदू मिरजकर यांनी वारंवार गैरहजर राहणाऱ्या तसेच नोटीस बजावूनही उत्तर न देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात प्रादेशिक आयुक्त आणि नगरविकास खात्याकडे तक्रार करून कारवाई करण्याबाबत शिफारस करण्यात येईल, असा ठराव पास केला. त्यानंतर अध्यक्षांसह उपस्थित सर्व सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकून सभात्याग केला.
Source link



