कुपोषणमुक्त देवगडसाठी मुलांना सकस आहार द्या; उपसभापती अमोल लोके यांचे पालकांना आवाहन;देवगडात ‘नवचेतना आधारशिला’ बाल मेळावा

देवगड / प्रतिनिधी : बालवयातच मुलांना सकस व सात्त्विक आहार दिल्यास त्यांच्या शारीरिक वाढीसोबतच आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते. त्यामुळे पालकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करून मुलांना पौष्टिक आहार द्यावा आणि देवगड तालुका कुपोषणमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन देवगड पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके यांनी केले.
शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारा ‘नवचेतना आधारशिला बाल मेळावा’ उपक्रम गावागावातील अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविला जात आहे. कुणकेश्वर-चांदेलवाडी येथील अंगणवाडी केंद्रात आयोजित बाल मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी अमोल लोके बोलत होते.
यावेळी सरपंच महेश ताम्हणकर, उपसरपंच शशिकांत लब्दे, डॉ. कोमल मांडवकर, सावित्री घाडी, विष्णू पेडणेकर, दिलीप घाडी, बाबाजी पेडणेकर, अमित घाडी, अंगणवाडी सेविका शुभांगी तेली, शरयू हिर्लेकर, स्नेहल लाड, आशा सेविका रिद्धी बाईत, श्रुतिका कदम, भूमी देऊलकर आदी उपस्थित होते.
घरगुती व पौष्टिक आहाराला प्राधान्य द्या
कुणकेश्वरचे सरपंच महेश ताम्हणकर यांनी मुलांना बाहेरील खाद्यपदार्थ देण्याऐवजी घरगुती पदार्थ, फळे आणि पौष्टिक आहार देण्याचे आवाहन केले. गाव आरोग्यसंपन्न करण्यासाठी सुरू असलेल्या या उपक्रमात ग्रामपंचायत सहभागी असून, पालकांनी आरोग्य सेविका व आशा सेविकांना सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. कोमल मांडवकर यांनी पोषण आहार कार्यक्रमाचा कालावधी वाढवून महिनाभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. मुलांच्या आहारात विविध पौष्टिक घटकांचा समावेश करावा, तुपाचा योग्य प्रमाणात वापर करावा तसेच पॅकेज्ड आणि बाहेरील खाद्यपदार्थ देणे टाळावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका, माता-पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
76 वर्षीय सावित्री घाडी यांच्या हस्ते उद्घाटन
कुणकेश्वर-चांदेलवाडी येथील ‘नवचेतना आधारशिला बाल मेळाव्या’चे उद्घाटन गावातील 76 वर्षीय ज्येष्ठ महिला सावित्री घाडी यांच्या हस्ते करण्यात आले.
Source link



