पोईप-पालववाडी मारहाण प्रकरणातील संशयिताची सशर्त जामिनावर मुक्तता

मालवण / प्रतिनिधी : पोईप-खालची पालववाडी येथे जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित प्रकाश रामचंद्र पालव (वय 64) यांची मालवण येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली.
संशयितातर्फे ॲड. स्वरूप नारायण पई आणि ॲड. अंबरीष गावडे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, 7 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आपल्या खालची पालववाडी येथील घरात असताना त्याचा चुलतभाऊ प्रकाश पालव हा जमिनीच्या वादातून घरात जबरदस्तीने शिरला. यावेळी फिर्यादीच्या वडिलांना ढकलण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता लाकडी दांड्याने त्याच्या डोक्यावर व हातावर मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेत फिर्यादीच्या हाताला फ्रॅक्चर तसेच डोक्याला दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी मालवण पोलिसांनी तक्रार नोंदवून भारतीय न्याय संहितेतील कलम 115(1), 118(1), 118(2), 333 आणि 352 अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, मालवण यांच्या न्यायालयात हजर केले.
अधिक तपासासाठी न्यायालयाने संशयिताला 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर संशयिताला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर केली.
यानंतर संशयितातर्फे न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने प्रकाश पालव यांची 15 हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
Source link



