Peru Earthquake | पेरूमधील भूकंपात सहा जणांचा बळी, जवळपास 50 घरे कोसळली ,बचावकार्य सुरू

►वृत्तसंस्था लिमा
पेरूच्या मध्यवर्ती डोंगराळ प्रदेशात रविवारी झालेल्या दोन भूकंपांमध्ये किमान सहा जणांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाले. या भूकंपांमुळे जवळपास 50 घरे कोसळून पडल्यामुळे सुमारे 300 लोकांना त्याचा फटका बसला. बचाव आणि मदत पथके ढिगारे हटवण्याचे आणि संभाव्य अडकलेल्या लोकांचा शोध घेण्याचे काम करत आहेत.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानुसार, पहिला भूकंप 5.1 तीव्रतेचा होता. त्यानंतर काही वेळातच 3.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला. दोन्ही भूकंपांचे केंद्रबिंदू राजधानी लिमाच्या पूर्वेला सुमारे 300 किलोमीटर अंतरावर होते.
४८ घरे उद्ध्वस्त
या नैसर्गिक आपत्तीनंतर मदत व बचावकार्याला गती देण्यात आली आहे. प्राथमिक मूल्यांकनानुसार 48 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच इतर 18 घरांचे नुकसान झाले आहे. बाधितांसाठी तात्पुरती निवारागृहे आणि तंबू उपलब्ध करून दिले जात असल्याचे राष्ट्रीय नागरी संरक्षण संस्थेचे प्रमुख लुईस वास्केझ यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांच्या मते, बाधित भागातील बहुतेक घरे मातीच्या विटांची बनलेली असल्यामुळे मोठे नुकसान झाले. पेरू हा देश पॅसिफिक महासागराच्या ‘रिंग ऑफ फायर’ प्रदेशात वसलेला असल्याने या भागात जगातील सुमारे 85 टक्के भूकंपीय हालचाली होतात. यामुळेच या देशाला वेळोवेळी भूकंपांचा फटका बसतो.
Source link



