Uncategorized

राज्य महिला आयोग अध्यक्षांची सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रसूतीगृहाला भेट

दिशादर्शक फलक, इतर कारणांवरून अधिकारी धारेवर

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

गर्भवती, माता आणि रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे घेऊन जाण्यासाठी त्यांच्याकडेच देण्याचा प्रकार त्वरित थांबवा आणि रुग्णांना सहकार्य करा. तसेच सर्वत्र दिशादर्शक फलक बसवा, असा आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष नागलक्ष्मी चौधरी यांनी सोमवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूतीगृह आणि विविध विभागांना भेट दिल्यानंतर बजावला. कोणत्याही परिस्थितीत रुग्णांची गैरसोय करू नका, असेही त्यांनी सुनावले.

गतवर्षीदेखील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष नागलक्ष्मी चौधरी यांनी सिव्हिल हॉस्पिटलला अचानक भेट देऊन पाहणी केली होती. वर्षभरानंतर त्यांनी सोमवार दि. 7 रोजी पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलला अचानक भेट दिली. गतवर्षीच्या तुलनेत यावेळी सुधारणा झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूतीगृहात दररोज 25 ते 30 प्रसूती होतात. मात्र संबंधितांना रक्ताचे नमुने तपासणीसाठी स्वत:च प्रयोगशाळेकडे न्यावे लागतात, हे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. रक्ताचे नमुने घेण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे त्यांनीच प्रयोगशाळेपर्यंत रक्ताचे नमुने पोहोचवले पाहिजेत. तसेच यावर तातडीने कारवाई करावी, अन्यथा दुसऱ्या एजन्सीची नियुक्ती करावी, असे त्यांनी सूचविले.

सिव्हिल हॉस्पिटलला येणारे रुग्ण गरीब व मध्यमवर्गीय असतात. बहुतांश जणांना कोठे कोणता विभाग आहे हे समजत नाही. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने दिशादर्शक फलक बसवावेत. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील स्वच्छतागृह बंद असल्याने पुरुष स्वच्छतागृहात महिलांना जावे लागत आहे. इतकेच नव्हे तर त्या ठिकाणी स्वच्छताही नाही. यावर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसूतीगृहात स्कॅनिंग, पिण्याचे गरम पाणी व इतर यंत्रसामग्री आहे. यंदा प्रसूतीदरम्यान माता मृत्यू दर शून्य असून रक्तस्त्राव, हिमोग्लोबीन व इतर कारणांमुळे शिशुंचा मृत्यू होत आहे. तालुकास्तरीय हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा दिली पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी बिम्सचे संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प, प्रशासकीय अधिकारी रेश्मा तालिकोटी, पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

दहा अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती

रक्ताचे नमुने घेतल्यानंतर ते रुग्ण किंवा नातेवाईकांकडे देण्याऐवजी थेट प्रयोगशाळेकडे नेण्यासाठी आजच दहा अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विविध ठिकाणी दिशादर्शक फलक तातडीने बसविले जातील.

-डॉ. विनय दास्तीकोप्प, संचालक बिम्स


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​