भारतीय सुरक्षा दल आता ‘बलवान’

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी संरक्षण खरेदी परिषदेची (डीएसी) बैठक झाली. या बैठकीत सशस्त्र दलांची क्षमता वाढवण्यासाठी सुमारे 1.10 लाख कोटी रुपयांच्या संरक्षण खरेदीला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. याप्रसंगी लष्करासाठी रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गी आणि आण्विक टेहळणी वाहनांना मंजुरी देण्यात आली. नौदलासाठी ‘अरुध्रा’ या आधुनिक निगराणी रडारच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली. तसेच हवाई दलाच्या लढाऊ विमानांची लढाऊ क्षमता वाढवण्याच्या प्रस्तावांनाही मंजुरी मिळाल्याने नजिकच्या काळात या प्रणाली सशस्त्र दलांची सज्जता नव्या उंचीवर नेतील आणि देशाची सुरक्षा अधिक ‘शक्तिशाली’ करतील.
डीएसीने विविध खरेदी प्रस्तावांना तत्त्वत: प्रशासकीय मंजुरी दिलेल्या प्रस्तावांपैकी सुमारे 98 टक्के प्रस्ताव भारतीय उद्योगांकडून खरेदी केले जातील. या मंजुरीमुळे लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी अनेक महत्त्वपूर्ण शस्त्रs, वाहने, रडार आणि लष्करी प्रणाली खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, डीएसीने विविध खरेदी प्रस्तावांना ‘आवश्यकतेची स्वीकृती’ दिली आहे. ही कोणत्याही उपकरणाच्या खरेदीसाठी अंतिम मंजुरी नसून, पुढील खरेदी प्रक्रिया सुरू करण्यासाठी दिलेली एक महत्त्वपूर्ण प्राथमिक मंजुरी मानली जाते. हा निर्णय भारतीय संरक्षण दलांची लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी आणि आत्मनिर्भरता मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एकूण मंजुरींपैकी सुमारे 98 टक्के खरेदी भारतीय उद्योगाकडून केली जाईल. यामुळे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमांना नवी चालना मिळेल. याअंतर्गत देशातील सार्वजनिक आणि खासगी संरक्षण कंपन्या जवळपास सर्वच खरेदीमध्ये प्रमुख भूमिका बजावतील. साहजिकच परदेशी संरक्षण उपकरणांच्या खरेदीवरील अवलंबित्व कमी होण्यासही मदत होईल.
लष्कराच्या दिमतीला भक्कम प्रणाली
संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतीय लष्करासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये उच्च-गतिशील वाहने, स्वयंचलित सुरुंग पेरणी यंत्रे, प्रगत हलकी हेलिकॉप्टर्स, ट्रॉल टँक्स आणि सर्वत्र ब्रिज प्रणाली यांचा समावेश आहे. रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गी किंवा आण्विक पदार्थांपासून धोका असलेल्या भागांमध्ये सीबीआरएन टेहळणी वाहने अत्यंत उपयुक्त ठरतील. ही वाहने क्षेत्रे शोधण्यास, ओळखण्यास, निरीक्षण करण्यास आणि सीमांकित करण्यास सक्षम असतील. उच्च-गतिशील वाहनांमुळे लष्कराची दुर्गम आणि आव्हानात्मक भूभागात हालचाल करण्याची आणि पुरवठा पोहोचवण्याची क्षमता वाढेल. लष्करासाठी प्रगत हलकी हेलिकॉप्टर्स देखील खरेदी केली जाणार असल्यामुळे त्यांचा वापर विविध भूभागांमध्ये आणि जटिल लष्करी मोहिमांमध्ये करता येईल. याव्यतिरिक्त ट्रॉल टँक्स आणि ब्रिज प्रणाली लढाऊ सैनिकांना नद्या, ओढे आणि इतर अडथळे पार करण्यास मदत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. या प्रणालींमुळे लढाईदरम्यान सैन्य आणि लष्करी वाहनांची जलद हालचाल शक्य होईल.
नौदलाचा ताफाही ताकदवान
भारतीय नौदलासाठी ‘अरुद्र’ रडार खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हे रडार विविध नौदल हवाई तळांवरील जुन्या हवाई मार्ग निगराणी रडारच्या जागी स्थापित केले जाऊ शकतात. ‘अरुद्र’ ही एक आधुनिक निगराणी रडार प्रणाली असून त्याच्या समावेशामुळे नौदल हवाई तळांच्या निगराणी क्षमतांना बळकट करेल. नौदलासाठी मरीन गॅस टर्बाइनची रचना, विकास आणि त्यानंतरच्या खरेदीलाही मंजुरी देण्यात आली आहे. मरीन गॅस टर्बाइन हे युद्धनौकांच्या प्रणोदन प्रणालीचा, म्हणजेच त्यांच्या मुख्य प्रणोदन प्रणालीचा भाग आहे. त्यांची रचना आणि विकास स्वदेशी असल्यामुळे नौदलाचे परदेशी कंपन्यांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल.
हवाई दलाची झेपही विस्तारणार
भारतीय हवाई दलासाठीही अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये लढाऊ विमाने, वाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टर यांच्या लढाऊ क्षमता वाढवण्याच्या प्रस्तावांचा समावेश आहे. जमिनीवर आधारित बहुउद्देशीय जॅमर खरेदी करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. ही प्रणाली शत्रूचे रडार प्रभावीपणे जॅम करेल. यामुळे भारतीय लष्करी विमानांना आणि इतर लष्करी प्रणालींना युद्धकाळात इलेक्ट्रॉनिक युद्धात फायदा मिळेल.
कागदी दस्तावेजाऐवजी ‘स्मार्टकार्ड’
डीएसीने संरक्षण दलांच्या सुरक्षित प्रवेश कार्ड प्रणालीच्या अंमलबजावणीलाही मंजुरी दिली. या प्रणालीअंतर्गत सध्याची कागदी ओळखपत्रे, प्रवेश पास आणि परवानग्या यांच्या जागी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट कार्ड आणले जातील. यामुळे तिन्ही दलांमधील ओळख आणि प्रवेश प्रणाली अधिक सुरक्षित आणि आधुनिक होण्यास मदत होईल. विविध लष्करी आस्थापनांमध्ये या प्रणालीच्या वापरामुळे सुरक्षा आणि ओळख प्रक्रियेतही सुधारणा होईल.
संरक्षण दलांना काय मिळेल?
लष्कर : उच्च गतिशीलतेचे वाहने (एचएमव्ही), माईनस्वीपर्स, अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर्स, ट्रॉल टँक्स आणि सर्वत्र ब्रिज सिस्टीम, रासायनिक धोके ओळखण्यास सक्षम असलेली विशेष सीबीआरएन वाहने.
नौदल : नौदलासाठी नवीन ‘अरुध्र’ रडार, युद्धनौकांसाठी मरीन गॅस टर्बाइन
हवाई दल : लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स, शत्रूचे रडार रोखण्यासाठी जॅमर्स, डिजिटल स्मार्टकार्ड प्रणाली.
Source link



