सावंतवाडीत मोकाट कुत्र्यांवर नियंत्रणासाठी विशेष पथक दाखल

सावंतवाडी प्रतिनिधी : शहरात मोकाट कुत्र्यांनी गेल्या काही कालावधीत दहशत माजवली होती. मात्र, अखेर आता मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्भीजीकरण व रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्याच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात आली आहे. यासाठी नागपूर येथील सुमारे १५ जणांची टीम सावंतवाडीत दाखल झाली. या टीमने जवळपास ३० मोकाट कुत्र्यांना जेरबंद करून क्वारंटाईन केले आहे. तीन दिवसांनंतर या मोकाट कुत्र्यांना पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडण्यात येणार असून, अशी योजना सावंतवाडी नगरपालिकेने हाती घेतली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मोकाट कुत्र्यांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. त्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगरपालिकेने मोकाट कुत्र्यांच्या दहशतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. यानुसार, कोल्हापूर येथील सोसायटी फॉर ॲनिमल या संस्थेमार्फत कुत्र्यांचे निर्भीजीकरण व लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी मोकाट कुत्रे पकडणे, त्यांना क्वारंटाईन करणे, निर्भीजीकरण व लसीकरण करणे यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यामध्ये संबंधित संस्थेला हे काम देण्यात आले आहे. या संस्थेकडे नागपूर येथील कुत्रे पकडणे, क्वारंटाईन करणे व लसीकरण करणारी विशेष टीम कार्यरत आहे.
मंगळवारी ही १५ जणांची टीम सावंतवाडीत दाखल झाली. सावंतवाडी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी विनोद सावंत व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शहरातील विविध भागांत फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेत दिवसभरात ३० हून अधिक मोकाट कुत्रे पकडण्यात यश आले. सावंतवाडी येथील स्मशानभूमी परिसरात कुत्र्यांसाठी विशेष क्वारंटाईन कक्ष तयार करण्यात आला आहे. कुत्रे पकडल्यानंतर त्यांना तीन दिवस या कक्षात ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत त्यांच्यावर निर्भीजीकरणाची शस्त्रक्रिया तसेच रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात येईल. त्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ अधिवासात सोडण्यात येणार आहे.
संपूर्ण शहरातील मोकाट कुत्र्यांचे निर्भीजीकरण व लसीकरण पूर्ण होईपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचे आरोग्य निरीक्षक विनोद सावंत यांनी सांगितले. ही मोहीम दोन दिवस राबविण्यात येत असून, पहिल्या दिवशी २२ कुत्र्यांना जेरबंद करण्यात आले. नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले आणि मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे.
Source link



