कारिवडे कुंभारवाडी येथील २२ वर्षीय युवकाची आत्महत्या

सावंतवाडी : तालुक्यातील कारिवडे-कुंभारवाडी येथील २२ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. प्रवीण चंद्रकांत खडपकर असे मृत युवकाचे नाव आहे. ऐन उमेदीच्या काळात प्रवीणने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण गेल्या एका वर्षापासून गोव्यातील एका कंपनीत नोकरीला होता. तो दररोज आपल्या दुचाकीने कामावर ये-जा करत असे. सोमवारी सायंकाळी तो नेहमीप्रमाणे कामावरून घरी आला होता. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्याचे आई-वडील मजुरीच्या कामासाठी बाहेर पडले. त्यामुळे घरात प्रवीण एकटाच होता.
दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आई जेवणासाठी घरी आली असता, बेडरूममधील छताच्या लोखंडी पाईपला नायलॉनच्या दोरीने प्रवीणने गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. हे विदारक दृश्य पाहून आईने हंबरडा फोडला. तिच्या आक्रोशाने शेजाऱ्यांनी तातडीने धाव घेतली आणि घटनेची माहिती पोलिसांच्या ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, उपनिरीक्षक माधुरी मुळीक, पोलीस हवालदार दीपक शिंदे व सुरेश पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची खबर शंकर लक्ष्मण सावंत यांनी पोलिसांत दिली. प्रवीणला तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
Source link



