राजकीय पक्षांच्या कार्यालयात एसआयआरचे फॉर्म भरल्यास कठोर कारवाई, निवडणूक आयोगाचे स्पष्ट इशारा

त.भा.प्रतिनिधी, मुंबई,
राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमादरम्यान राजकीय पक्षांच्या कार्यालयात शिबिरे भरवून मतदारांचे फॉर्म भरून घेण्यात आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा राज्याच्या मुख्य निवडणूक अधिक्रायांनी दिला आहे.
निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक ठेवण्यासाठी हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात 30 जूनपासून एसआयआर मोहीम सुरू असून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची माहिती व आवश्यक फॉर्म भरून घेत आहेत.
आयोगाने या मोहिमेची मुदत 8 ऑगस्टपर्यंत वाढविली असून या कालावधीत प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तथापि, मतदारांचा पत्ता शोधण्यासाठी किंवा आवश्यक माहिती मिळविण्यासाठी राजकीय पक्षांनी अधिकृतपणे नियुक्त केलेल्या बूथ लेव्हल एजंट (बीएलए) यांची मदत घेण्यास आयोगाने परवानगी दिली आहे. मात्र फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत राजकीय पक्षाशी संबंधित इतर कोणत्याही व्यक्तीचा सहभाग किंवा हस्तक्षेप होऊ नये, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
घर बंद असल्यास तीन वेळा भेट देणार
बीएलओने प्रत्येक मतदाराच्या घरी किमान एकदा भेट देणे बंधनकारक आहे. संबंधित घर बंद असल्यास किमान तीन वेळा भेट देऊन त्याची नोंद ठेवावी, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. शहरी भागात अनेक ठिकाणी मतदारांचे पत्ते अपूर्ण किंवा चुकीचे असल्याने बीएलओंना घरे शोधण्यात अडचणी येतात.
अशा वेळी संबंधित मतदान केंद्र, सोसायटीचे आवार, सार्वजनिक ठिकाण किंवा शासकीय कार्यालय येथे बसून मतदारांकडून अचूक पत्त्याची माहिती घेता येईल. मात्र त्यानंतर संबंधित मतदाराच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊनच फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
पक्ष कार्यालयात शिबिरांना मनाई
आयोगाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही परिस्थितीत राजकीय पक्षांच्या कार्यालयात एसआयआरसाठी शिबिरे आयोजित करून फॉर्म भरून घेऊ नयेत. अशा प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेबाबत शंका निर्माण होऊ शकते. त्यामुळे असे प्रकार आढळल्यास त्याची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
Source link



