Uncategorized

आईच्या कुशीत परतला चिमुकला प्रज्वल !

मालवण पोलिसांच्या तत्परतेने आणि नागरिकांच्या सतर्कतेने टळला अनर्थ

मालवण । प्रतिनिधी

पहाटेच्या अंधारात घरापासून दूर भरड परिसरातील रस्त्यावर एकटाच भटकणारा दीड ते दोन वर्षांचा चिमुकला प्रज्वल पाहून संपूर्ण मालवण शहर हादरून गेले होते. भटक्या कुत्र्यांच्या घोळक्यात सापडलेल्या या निष्पाप जीवाला स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत सुरक्षित केले आणि त्यानंतर मालवण पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अखेर या चिमुकल्याची त्याच्या आईशी सुखरूप भेट घडून आली. या हृदयस्पर्शी घटनेने उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.पहाटेच्या सुमारास भरड परिसरात एकटा फिरत असलेल्या प्रज्वलला काही भटक्या कुत्र्यांनी घेरले होते. कोणताही अनर्थ घडण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी धाव घेत त्याला सुरक्षित केले. माहिती मिळताच मालवण पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चिमुकल्याला ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्याची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितल्यानंतर त्याच्या पालकांचा शोध सुरू करण्यात आला.पोलिस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत आणि पोलीस कर्मचारी रंजू डोये यांनी अथक प्रयत्न करत परिसरातील माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शोधमोहीम राबवली. अखेर हा मुलगा एसटी स्टँड परिसरात राहणाऱ्या परप्रांतीय कामगार कुटुंबातील असल्याचे समोर आले. रात्री घराचा दरवाजा उघडा राहिल्याने प्रज्वल घराबाहेर पडून चालत चालत भरड परिसरापर्यंत पोहोचला होता.कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रज्वलला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. अनेक तासांच्या चिंतेनंतर आपल्या पोटच्या गोळ्याला सुखरूप पाहताच आईने त्याला घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले. त्या क्षणी उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते.या संपूर्ण कारवाईत पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. मालवण पोलिसांची तत्परता, पोलिस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत व पोलीस कर्मचारी रंजू डोये यांचे परिश्रम आणि स्थानिक नागरिकांची जागरूकता यामुळे एका आईला तिचा हरवलेला प्रज्वल पुन्हा मिळाला. त्यामुळे मालवण शहरात पोलिसांविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त होत असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​