Uncategorized

Andreeva, Kostyuk Enter Semifinals

अर्नाल्डी, कोबोली, अॅलियासिमे, बेरेटिनी उपांत्यपूर्व फेरीत,   ओसाका, सोराना सिर्स्टिया, स्विटोलिना  यांचे आव्हान समाप्त

वृत्तसंस्था, पॅरिस

2026 च्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत रशियाची 19 वर्षीय मायरा अँड्रीव्हा तसेच युक्रेनची मार्टा कोस्ट्युक यांनी महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. बेलारुसच्या टॉपसिडेड साबालेंकाने ओसाकाचा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. स्विटोलिनाचे आव्हान संपुष्टात आले. पुरूषांच्या विभागात इटलीचे मॅटेव अर्नांल्डी, मॅटेव बेरेटिनी तसेच कोबोली आणि कॅनडाच्या फेलिक्स ऑगर अॅलियासिमे यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रशियाच्या 19 वर्षीय अँड्रीव्हाने रुमानियाच्या अनुभवी सोरेना सिर्स्टियाचा 6-0, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत शेवटच्या 4 खेळाडूंत स्थान मिळविले. या स्पर्धेत अमेरिकेची विद्यमान विजेती कोको गॉफ आणि आतापर्यंत चारवेळा ही स्पर्धा जिंकणारी इगा स्वायटेक यांचे आव्हान यापूर्वीच समाप्त झाल्याने आता अँड्रीव्हाला जेतेपदाची निश्चित संधी उपलब्ध झाली आहे. अँड्रीव्हाचा उपांत्य फेरीचा सामना युक्रेनच्या मार्टा कोस्ट्युकशी होईल. सिर्स्टियाची ही तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरी होती. मात्र 36 वर्षीय सिर्स्टियाला रशियाच्या अँड्रीव्हाने सहज पराभूत केले.

महिला एकेरीच्या अन्य एका युक्रेनच्या मार्टा कोस्ट्युकने आपल्याच देशाच्या इलिना स्विटोलिनाचा 6-3, 2-6, 6-2 अशा तीन सेट्समधील लढतीत पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. 23 वर्षीय कोस्ट्युकने आपला हा विजय युक्रेनच्या आपल्या चाहत्यांना समर्पित केला. या लढतीमध्ये कोस्ट्युकने पहिला सेट 6-3 असा जिंकल्यानंतर अनुभवी स्विटोलिनाने आपल्या बेसलाईन खेळाच्या जोरावर दुसरा सेट 6-2 असा जिंकून बरोबरी साधली. पण तिसऱ्या आणि शेवटच्या सेटमध्ये कोस्ट्युकच्या वेगवान फोरहॅन्ड फटक्यासमोर स्वीटोलिनाकडून वारंवार चुका झाल्याने तिला या शेवटच्या सेटमध्ये केवळ दोन गेम्स जिंकता आले. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत स्विटोलिनाला सहाव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली आहे.

साबालेंका उपांत्यपूर्व फेरीत

महिला एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात बेलारुसच्या टॉपसिडेड आर्यना साबालेंकाने जपानच्या नाओमी ओसाकाचा 7-5, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. या सामन्यात ओसाकाच्या तुलनेत साबालेंकाचा खेळ अधिक दर्जेदार झाला. आपल्या फटक्यामध्ये सातत्य राखत तसेच वेगवान आणि अचूक सर्व्हिसच्या जोरावर ओसाकाला पराभूत करण्यात साबालेंकाला फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. साबालेंकाने या स्पर्धेत 14 वेळा उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे.

संघर्षानंतरही टायफो पराभूत

पुरूष एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात इटलीच्या मॅटेव अर्नाल्डीने अमेरिकेच्या फ्रान्सीस टायफोचे आव्हान 7-6 (7-5), 6-7 (5-7), 3-6, 7-6 (7-3), 6-4 अशा पाच सेट्समधील चुरशीच्या लढतीत पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. हा सामना सुमारे साडेपाच तास चालला होता. फ्लडलाईट्समध्ये हा सामना खेळविला गेला. आता अर्नांल्डीचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना इटलीच्या मॅटेव बेरेटिनीशी होणार आहे.

चौथ्या फेरीतील अन्य एका सामन्यात इटलीच्या मॅटेव बेरेटिनीने अर्जेंटिनाच्या जुआन सेरुन्डोलोचा 6-3, 7-6 (7-2), 7-6 (8-6) अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. बेरेटिनीने या स्पर्धेत दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे. 2007 साली बेरेटिनीने या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. बेरेटिनीची उपांत्यपूर्व लढत इटलीच्या अर्नांल्डीशी होणार आहे. अर्जेंटिनाच्या सेरुन्डोलोने या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत इटलीच्या टॉपसिडेड जेनिक सिनरला पराभवाचा धक्का दिला होता.

अॅलियासिमे उपांत्यपूर्व फेरीत

कॅनडाच्या फेलिक्स ऑगेर अॅलियासिमेने चिलीच्या अॅलेजेंड्रो टॅबिलोचा 6-3, 7-5, 6-1 अशा सेट्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. टेनिस क्षेत्रातील चार ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठणारा अॅलियासिमे हा कॅनडाचा पहिला टेनिसपटू ठरला आहे. आता अॅलियासिमेचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना इटलीच्या फ्लॅव्हीओ कोबोलीशी होणार आहे.

इटलीच्या दहाव्या मानांकीत कोबोलीने अमेरिकेच्या बिगर मानांकीत स्वेज्दाचा 6-2, 6-3, 6-7 (3-7), 7-6 (7-5) असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत 24 वर्षीय कोबोली उपांत्यपूर्व फेरी गाठणारा इटलीचा तिसरा टेनिसपटू ठरला आहे. गेल्या वर्षी कोबोलीने विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.

महिलांच्या दुहेरीमध्ये सिनीयाकोव्हा आणि टाऊनसेन्ड यांनी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात केंपेन आणि क्लेपॅक यांचा 6-1, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करून उपांत्य फेरी गाठली. तसेच दुसऱ्या एका सामन्यात डाब्रोवस्की आणि स्टिफेनी यांनी 11 व्या मानांकित व्होनारेव्हा आणि लॉरा सिगमंड यांचा 6-4, 7-5 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

 

पॉईंटर्स

-19 वर्षीय अँड्रीव्हाला पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याची संधी

-कोस्ट्युकने आपला विजय कीव्हमधील घटनेंनंतर युक्रेनच्या जनतेला समर्पित केला.

-मॅटेव अर्नाल्डीने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत सर्वाधिक 17 तास 42 मिनिटे कोर्टवर घालवित नवा विक्रम केला. 1991 पासून या विक्रमाची नोंद केली जात आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​