कायदा पालनात कर्नाटक पोलीस आघाडीवर

गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांचे प्रशंसोद्गार, पोलीस वसतिगृह प्रकल्पाचे उद्घाटन
बेळगाव : कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्याबरोबरच कायद्याचे पालन व न्याय व्यवस्थेत कर्नाटक पोलीस आघाडीवर आहेत. राज्यात शांतता नांदण्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या पोलिसांचे कुटुंबीय सुरक्षित व समाधानाने रहावेत यासाठी वसतिगृहांची उभारणी करून पायाभूत सुविधा पुरविण्यात येत आहेत, अशी माहिती गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली. शुक्रवारी सिटी पोलीस लाईन पोलीस क्वॉर्टर्सचे उद्घाटन व इतर इमारतींच्या कोनशिला कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस खात्याच्यावतीने बेळगाव भागात ऐतिहासिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. 67.79 कोटी रुपये खर्चाचे गोकाक, कित्तूर, कुलगोड, संकेश्वर, चिकोडीसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी इमारतींचा कोनशिला बसविण्यात येत आहे. शहापूरमध्ये 3.92 कोटी रुपये खर्चून वसतिगृहे उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारकडून जातीय दंगलींवर आळा
एका घराच्या उभारणीसाठी 38 लाख रुपये खर्च होतात. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात 2 हजार कोटी रुपये दिले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात 350 कोटी रुपये देण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत. पोलीस दलाला सुविधा पुरविण्याचे काम सरकारने केले आहे. पोलिसांसाठी अनेक योजना दिल्या आहेत. पोलिसांनी लोकसेवेसाठी सदैव तत्पर रहावे. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहिली तरच उद्योग-व्यवसाय चालून येतात. गेल्या तीन वर्षात आपल्या सरकारने जातीय दंगलींवर आळा घातला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशानुसार सर्व जण समानतेने जगावे, या दिशेने पोलीस दलाचे कार्य सुरू आहे.
यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ म्हणाले, पोलीस खाते 24 तास कर्तव्यात असते. सणासुदीच्या वेळीही त्यांना सुट्या मिळत नाहीत. समाजरक्षणासाठी अविरतपणे ते काम करतात. त्यांच्या कुटुंबीयांसाठी वसतिगृहांची उभारणी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे म्हणाले, पोलीस व आयुक्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी जिल्हा पंचायतीच्यावतीने सिटी पोलीस लाईनशेजारी अक्का कॅफे सुरू करण्यात येणार आहे.
यावेळी वसतिगृहांच्या चाव्या पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांना सोपविण्यात आल्या. सिटी पोलीस लाईन व शिवाजीनगर परिसरात नव्या इमारतींसाठी कोनशिलाही बसविण्यात आल्या. बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष सुनील हणमन्नावर, प्रादेशिक आयुक्त जानकी के. एम., अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक आर. हितेंद्र, बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक डॉ. चेतनसिंग राठोड, जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांच्यासह अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणार
अमलीपदार्थांची विक्री व सेवन तरुणाईमध्ये वाढल्याचे दिसून येत आहे. त्यांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जात आहेत. अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देतानाच तरुणाईला व्यसनापासून रोखण्यासाठी कॉलेजना भेटी देऊन जागृती करण्यात येत आहे, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले. सायबर गुन्हेगारीत वाढ होत चालली आहे. तंत्रज्ञानाच्या वापराने अशी प्रकरणे शोधून गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येईल, असेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
Source link



