मिर्झा इराणच्या घुटण्यावर साहील कोली पराभूत

येळ्ळूर कुस्ती मैदान : महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, पृथ्वीराज पाटील यांचे प्रेक्षणीय विजय; प्रमुख लढती निकाली झाल्याने शौकीन समाधानी
बेळगाव : येळ्ळूर येथे कलमेश्वर, श्री चांगळेश्वरी व श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सवानिमित्त व लोकमान्य को-ऑप. सोसायटी पुरस्कृत लोकमान्य केसरी किताबच्या प्रमुख कुस्तीत इराणच्या मिर्झाने साहील कोलीला घुटणा डावावरती नवव्या मिनिटाला तर डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरने निरु गुर्जरला अवघ्या सात मिनिटात निकाल डावावर अस्मान दाखवून उपस्थित 25 हजारांहून अधिक कुस्ती शौकिनांची मने जिंकली. प्रमुख कुस्ती लोकमान्य केसरी किताबासाठी मिर्झा इराण व साहील कोली ही कुस्ती लोकमान्य सोसायटीचे संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, किरण गावडे, कुस्तीचे आश्रयदाते सतीश पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली.
या कुस्तीत पहिल्याच मिनिटाला मिर्झाने पायाला टाच मारुन कोलीला खाली घेण्याचा प्रयत्न केला. पण कोलीने त्यातून सुटका करुन घेतली. तिसऱ्या मिनिटाला दोन्ही हाताचे हप्ते भरुन कोलीला चीत करण्याचा पुरेपूर प्रयत्न मिर्झाने केला होता. पण शेवटच्या क्षणी बुटक्या कोलीला फिरविणे कठीण गेले. 5 मिनिटाला एकेरीपट काढून मिर्झा इराणने कोलीला खाली घेतले व घुटण्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून सावधगिरीने कोलीने सुटका करुन घेतली. सातव्या मिनिटाला दुहेरीपट काढत मिर्झा इराणने साहीलला खाली घेत घिस्स्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला. त्यातून साहीलने निसटण्याचा प्रयत्न करत असताना मजबूत घुटणा ठेवून नवव्या मिनिटाला घुटण्यावर अस्मान दाखवून लोकमान्य केसरीचा किताब पटकाविला. लोकमान्य सोसायटीच्या संचालकांच्या हस्ते किताब देवून त्याचा गौरव करण्यात आला.
निरुची विजयी घोडदौड कायम
दुसऱ्या क्रमांकाची लढत डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व हरियाणाचा निरु गुर्जर ही कुस्ती आश्रयदाते सतीश पाटील, बाळू पाटील, मलगौडा पाटील, प्रदीप एम. जे., वाय. एन. पाटील, वाय. एस. पाटील, पप्पू होनगेकर आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. कुस्तीच्या पहिल्याच मिनिटाला निरुने दोन्ही हाताचे हप्ते भरुन सदगीरला पाडविण्याचा प्रयत्न केला. पण अनुभवी सदगीरने त्यातून सुटका करुन घेतली. तिसऱ्या मिनिटाला हर्षवर्धनने एकेरीपट काढून निरुवर कब्जा मिळविला व घिस्स्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून निरुने सुटका करुन घेतली. पाचव्या मिनिटाला दुहेरीपट उपसून हर्षवर्धनने निकाल लावण्याचा प्रयत्न केला. पण निरुने चपळता दाखवत त्यातून तो बाहेर पडला. पण सातव्या मिनिटाला पायाला आकडी लावत मजबूत निकालावर निरुला चारीमुंड्या चीत करत आपली विजयी घोडदौड कायम राखली.
125 किलोच्या मल्लाला पृथ्वीराजने दाखविले अस्मान
तिसऱ्या क्रमांकाची लढत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व पंजाब केसरी मुसा पंजाब ही कुस्ती वर्धमान गंगाई, कृष्णा बिंदले, प्रमोद पाटील, भाऊ पाटील, हणमंत कुगजी, रमेश गोरल, प्रवीण पाटील, शिवाजी अतिवाडकर आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. बलदंड शरीरयष्टी असलेला मुसा व बुटक्या शरीराचा पृथ्वीराज पाटील यांच्यात लढत सुरू झाली. पृथ्वीराजने एकेरीपट काढण्याचा दोन ते तीन वेळा प्रयत्न केला. पण त्यात तो अपयशी ठरला. चौथ्या मिनिटाला पायाला टाच मारुन पृथ्वीराजने मुसाला खाली घेतले व मानेचा कस काढत मानेवर मजबूत घुटणा ठेवून फिरविण्याचा प्रयत्न केला. पण 125 किलो वजनाचा मुसा सहजासहजी घुटण्यावर फिरविणे कठीण गेले. त्यातून फिरविण्याचा प्रयत्न करत असताना मुसा पंजाबने पृथ्वीराजवर कब्जा मिळविला व पृथ्वीराजला घिस्स्यावरती फिरविण्याचा प्रयत्न करत असताना आठव्या मिनिटाला पृथ्वीराज पाटीलने खालून डंकी मारुन मुसा पंजाबला अस्मान दाखविले.
चौथी आणि पाचवी लढत बरोबरीत
चौथ्या क्रमांकाची लढत महाराष्ट्र चॅम्पियन राहुल सुळ व महाराष्ट्र चॅम्पियन कोल्हापूरचा राहुल ठोंबरे यांच्यात झाली. ही कुस्ती डावप्रतिडावाने झुंजली व पण वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आली. पाचव्या क्रमांकाची लढत सुबोध पाटील विरुद्ध हितु ठाकुर मथुरा ही कुस्ती डावप्रतिडावाने झुंजली आणि वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आली.
सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन बाळू अपराधने अनुजकुमार दिल्लीला एकचाक डावावरती पराभूत केले. सातव्या क्रमांकाची लढत उपकर्नाटक केसरी शिवा दड्डी व उदयकुमार दिल्ली ही लढत बरोबरीत राहिली. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत सुबोध लांडेने हरिषकुमार उत्तरप्रदेशचा घुटणा डावावरती पराभव केला. नवव्या क्रमांकाच्या लढतीत जोतिबा अटकळेने सदाशिव नलवडेचा एकलांगी डावावरती पराभव केला. दहाव्या क्रमांकाच्या लढतीत अक्षय चौगुले सांगलीला विजयी घोषित करण्यात आले. 11 व्या क्रमांकाच्या लढतीत पार्थ पाटील-कंग्राळी व नाथा पवार-बेनापूर ही कुस्ती जवळपास 25 मिनिटे झुंजली पण वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आली.
त्याचप्रमाणे मंजू धुशकी, कार्तिक इंगळगी, विक्रम तुर्केवाडी, भूमीपुत्र मुतगा, महादेव भिवशी-विजापूर, निखिल शिंदे-सांगली, संभाजी काकती, हर्ष कंग्राळी, सुफियान सय्यद-राशिवडे, श्री घाडी, पार्थ कंग्राळी, आर्यन मुतगा, तुकाराम किणये, मंथन-सांबरा, श्रेयश कंग्राळी, वेदांत मासेकर-येळ्ळूर, प्रतिक पाटील-येळ्ळूर, महांतेश संतीबस्तवाड, पांडु तुर्केवाडी, धर्मेंद्र पंजाब, अमित दिल्ली, निखिल यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन विजय मिळविला.
आखाड्यासाठी पंच म्हणून लक्कीसिंग, विश्वनाथ पाटील, नवीन मुतगा, प्रशांत पाटील-कंग्राळी, बाळासाहेब सुतार, हनुमंत गुरव, मारुती अनगोळकर, मारुती घाडी, राजाराम गुरव, सुरेश अष्टगी, कृष्णा पाटील-कंग्राळी, भाऊ पाटील-कंग्राळी, वसंत पावले, चेतन बुद्दण्णावर, शिवाजी पाटील-कडोली, यल्लाप्पा अनगोळकर, गणपत बन्नोसी यांनी काम पाहिले. प्रारंभी माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी व प्रमोद पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कुस्तीचे समालोचन कृष्णकांत राशिवडे व जोतिराम वांजे यांनी केले तर हणमंत घुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या रणालगीच्या तालावर सर्व कुस्ती शौकिनांना खिळवून ठेवले.
नवहिंद केसरी
नवहिंद कुमार केसरी लढतीसाठी 12 व्या क्रमांकाच्या कुस्तीत बेळगावच्या प्रथमेश हट्टीकर-कंग्राळीने अक्षय तांबे-शाहुपुरीचा एकचाक डावावरती पराभव करुन नवहिंद कुमार केसरी किताब पटकाविला.
Source link


