Uncategorized

हिमांत बिस्व सर्मा यांचा शपथविधी

पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेकांची उपस्थिती

वृत्तसंस्था / गुवाहाटी

आसामचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते हिमांत बिस्व सर्मा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण केले आहे. या राज्याची राजधानी गुवाहाटी येथे मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या भव्य समारंभात राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासह आणखी चार मंत्र्यांनीही शपथग्रहण केले आहे. या राज्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे हे सलग तिसरे सरकार आहे.

आसाम राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला प्रचंड यश मिळाले आहे. विधानसभेच्या एकंदर 126 जागांपैकी या आघाडीला 102 जागा प्राप्त झाल्या असून एकट्या भारतीय जनता पक्षाला 82 जागा मिळाल्या आहेत. मतांच्या टक्केवारीतही आघाडी अव्वल असून 50 टक्क्यांकडून अधिक मते तिला मिळाली आहेत. आघाडीत तीन प्रमुख पक्ष असून त्यांना मोठे यश मिळाले आहे.

चार मंत्र्यांचाही शपथविधी

मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा यांच्यासह रामेश्वर तेली (भारतीय जनता पक्ष), अतुल बोरा (आसाम गण परिषद), चरण बोरो (बोडोलँड पीपल्स फ्रंट) आणि अजंता नेओग (भारतीय जनता पक्ष) यांनीही मंत्री या नात्याने शपथग्रहण केले आहे. हा शपथविधी कार्यक्रम मंगळवारी गुवाहाटी येथील खानपारा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पटांगणात सहस्रावधी लोकांच्या उपस्थितीत पार पडला आहे. अतुल बोरा हे आसाम गण परिषदेचे ज्येष्ठ नेते असून या पक्षाचे एक संस्थापकही आहेत. रामेश्वर तेली हे आसाममधील चहामळे कामगारांचे नेते आहेत. ते काहीकाळ केंद्रीय मंत्रीही होते. चरण बोरो हे बोडोलँड पीपल्स फ्रंट या पक्षाचे नेते असून गेल्या सरकारमध्ये परिवहन मंत्री होते. अजंता नेओग या महिला असून त्यांच्याकडे मागच्या सरकारमध्ये अर्थमंत्रीपद होते. मंत्र्यांची निवड करताना प्रादेशिक, विभागीय आणि समाजघटक समतोलही राखला गेल्याचे दिसून येत आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथसिंग, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, आसामचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि भारतीय जनता पक्षाचे तसेच मित्रपक्षांचे वरिष्ठ नेते यांचा समावेश होता. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे 40 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडूही उपस्थित राहिले.

विधानसभा अध्यक्षपदी रणजित दास

आसाम विधानसभेचे अध्यक्षस्थान भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रणजित दास यांना दिले जाईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी भवानीपूर-सोरभोग या मतदारसंघातून मार्क्सवादी साम्यवादी पक्षाचे मनोरंजन तालुकदार यांचा पराभव केला. रणजित दास हे भारतीय जनता पक्षाचे अनुभवी नेते असून त्यांनी पंचायत आणि ग्रामीण विकास तसेच अन्न आणि नागरी पुरवठा आदी महत्त्वपूर्ण विभाग यापूर्वी मंत्री म्हणून सांभाळले आहेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​