Bangladesh in a strong position thanks to Tanzid Hasan’s century.

कर्णधार नजमुल हुसेन शांतोचे अर्धशतक, बांगलादेशला 153 धावांची आघाडी, स्टार्क-हेजलवुडचे प्रत्येकी 2 बळी
वृत्तसंस्था, डार्विन (ऑस्ट्रेलिया)
सलामीचा फलंदाज तानझिद हसनचे कसोटीतील पहिले शतक तसेच कर्णधार नजमुल हुसेन शांतोच्या अर्धशतकाच्या जोरावर येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर बांगलादेशने यजमान ऑस्ट्रेलियावर पहिल्या डावात 153 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव केवळ 198 धावांत आटोपल्यानंतर बांगलादेशने 1 बाद 96 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि दिवसअखेर त्यांनी 110 षटकांत 6 बाद 351 धावा जमविल्या. तानझिद हसन आणि मोमिनुल हक या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 102 धावांची शतकी भागिदारी केली. हॅजलवूडने हकला झेलबाद केले. त्याने 8 चौकारांसह 49 धावा जमविल्या.
तानझिद हसनला कर्णधार शांतोकडून चांगली साथ मिळाली. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 93 धावांची भागिदारी करत आपल्या संघाला सुस्थितीत नेले. बांगलादेशच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजीसमोर तंत्रशुद्ध आणि शिस्तबद्ध फलंदाजीचे दर्शन घडवित दिवसभरात आणखी पाच गडी गमविताना 258 धावा जमविल्या. 2003 नंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीत बांगलादेशची ही पहिली कसोटी आहे. उपाहारापर्यंत बांगलादेशने 51 षटकांत 2 बाद 181 धावा जमविल्या होत्या. खेळाच्या पहिल्या सत्रात बांगलादेशने 85 धावांची भर घालताना एकमेव गडी गमविला. तानझिद हसनने 103 चेंडूत 5 चौकारांसह अर्धशतक झळकविले. तर उपाहारावेळी तो 74 धावांवर खेळत होता.
उपाहारानंतरच्या दुसऱ्या सत्रात कर्णधार शांतोने 74 चेंडूत 5 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. या कालावधीत तानझिद हसनने कसोटी क्रिकेटमधील आपले पहिले शतक 188 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. शतक पूर्ण झाल्यानंतर तो नाथन लायनच्या गोलंदाजीवर स्टार्ककरवी झेलबाद झाला. त्याने 101 धावा केल्या. चहापानावेळी बांगलादेशने 78 षटकांत 3 बाद 286 धावा जमविल्या. कर्णधार शांतो 79 तर मुश्फिकुर रहीम 26 धावांवर खेळत होते.
खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये बांगलादेशने आणखी 3 गडी गमविताना 65 धावांची भर घातली. चहापानानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा नवा चेंडू घेतला. बांगलादेशचे त्रिशतक 497 चेंडूत फलकावर लागले. या शेवटच्या सत्रामध्ये कर्णधार शांतो हॅजलवूडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 126 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 84 धावा जमविताना मुश्फिकुर रहीमसमवेत चौथ्या गड्यासाठी 65 धावांची भागिदारी केली. लिटन दास स्टार्कच्या गोलंदाजीवर खाते उघडण्यापूर्वी झेलबाद झाला तर कमिन्सने मुश्फिकुर रहीमला झेलबाद केले. त्याने 55 चेंडूत 5 चौकारांसह 36 धावा जमविल्या. मेहदी हसन मिराज आणि हसन मेहमुद यांनी सातव्या गड्यासाठी उभेद्य 45 धावांची भागिदारी केली. मेहदी हसन मिराज 3 चौकारांसह 32 तर हसन मेहमुद 2 चौकारांसह 13 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियातर्फे हॅजलवूडने 68 धावांत 2, स्टार्कने 68 धावांत 2 तर कमिन्स आणि लायन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या कसोटीमध्ये बांगलादेश संघाला भक्कम आघाडी मिळविण्याची संधी लाभली आहे. त्यांचे अद्याप चार गडी खेळावयाचे आहेत. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर बांगलादेशचा संघ कसोटी सामना जिंकण्यासाठी आतुरलेला आहे. ऑस्ट्रेलियाचे क्षेत्ररक्षण दर्जेदार झाले नाही. त्याचा लाभ बांगलादेशच्या फलंदाजांनी उठविला.
ऑस्ट्रेलियन संघ आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत कसोटी मालिकेत आगामी 12 महिन्यांच्या कालावधीत 20 कसोटी सामने खेळणार असून त्यांचा दौरा दक्षिण आफ्रिका, भारत आणि इंग्लंड असा राहील.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प. डाव 53 षटकांत सर्वबाद 198, बांगलादेश प. डाव 110 षटकांत 6 बाद 351 (तानझिद हसन 101, नजमुल हुसेन शांतो 84, मोमिनुल हक 49, शदमान इस्लाम 20, मुश्फिकुर रहीम 36, मेहदी हसन मिराज खेळत आहे 32, हसन मेहमुद खेळत आहे 13, अवांतर 16, स्टार्क व हॅजलवूड प्रत्येकी 2 बळी, कमिन्स व लियॉन प्रत्येकी 1 बळी).
-बांगलादेशची 2003 नंतर ऑस्ट्रेलियन भूमीतील पहिली कसोटी
-दिवसभरात पाच गड्यांच्या मोबदल्यात 255 धावांची भर
-मोमिनुल हक, रहीम यांचेही उपयुक्त योगदान
Source link



