माडखोलमध्ये 48 तासांत दोन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित; वीज उपअभियंता शैलेंद्र राक्षे यांचा ग्रामस्थांकडून सत्कार

ओटवणे / प्रतिनिधी : माडखोल गावातील वीज समस्येवर तातडीने उपाययोजना करत महावितरणकडून अवघ्या 48 तासांत दोन नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून कार्यान्वित करण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिलेले आश्वासन अल्पावधीत पूर्ण केल्याबद्दल माडखोल ग्रामस्थांनी महावितरणचे वीज उपअभियंता शैलेंद्र राक्षे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
माडखोल सापळे स्टॉप आणि बामणादेवी येथील ट्रान्सफॉर्मर बंद पडल्याने या परिसरातील वीजपुरवठा गावातील अन्य ट्रान्सफॉर्मरवरून करण्यात येत होता. परिणामी इतर ग्राहकांनाही कमी दाबाच्या वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत होता. गणेशोत्सवाच्या काळात विजेची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने समस्या अधिक गंभीर होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर माडखोल ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने वीज उपअभियंता शैलेंद्र राक्षे यांची भेट घेऊन दोन्ही ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलण्याची मागणी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राक्षे यांनी गणेशोत्सवापूर्वी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून देण्याचे आश्वासन दिले.
यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने काम करत दोन दिवसांत दोन्ही नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून कार्यान्वित केले. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर माडखोल गावातील वीज समस्येचे सावट दूर झाले आहे.
ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या कामासाठी लाईनमन गोपाळ कुलकर्णी, टेक्निशियन प्रथमेश सावंत आणि आउटसोर्सिंग कर्मचारी कांबळे यांचे सहकार्य लाभले.
अधिकारी आणि नागरिकांमध्ये अनेकदा संघर्षाचे चित्र पाहायला मिळते. मात्र माडखोलमध्ये समस्या समजून घेत तातडीने कार्यवाही करणाऱ्या अधिकाऱ्याचे ग्रामस्थांनी केलेले कौतुक हे प्रशासन आणि जनता यांच्यातील समन्वयाचे उदाहरण ठरले आहे.
“वीज समस्यांमुळे ग्रामस्थांच्या संतप्त भावना असतात. मात्र एखादा अधिकारी जनतेची गरज ओळखून समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतो, तेव्हा त्याचे कौतुक करणे हेही आमचे कर्तव्य आहे,” असे माडखोलचे माजी सरपंच राजन राऊळ यांनी सांगितले.
यावेळी माजी सरपंच राजन राऊळ, उपसरपंच दत्ताराम कोळमेकर, शिवसेना ओबीसी सेलचे तालुका प्रमुख वासुदेव होडावडेकर, माजी उपसरपंच सुरेश आडेलकर, माडखोल सोसायटी संचालक प्रकाश नाईक, लखन आडेलकर, जीवन केसरकर, निलेश लातये, प्रभाकर गावडे, भरत राऊळ, भास्कर परब यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Source link



