गणेशोत्सवात कणकवली-कलमठ-आचरा मार्गावर अवजड वाहतूक बंद ठेवा; जि प सदस्या सुप्रिया मेस्त्रींची मागणी; आरटीओ आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन

कणकवली / प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली-कलमठ-आचरा मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक उत्सवाच्या संपूर्ण कालावधीत बंद ठेवावी, अशी मागणी कलमठच्या जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री यांनी केली आहे. याबाबत त्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) तसेच कणकवली पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी आणि भाविक दाखल होतात. कणकवली, कलमठ, आचरा तसेच परिसरातील ग्रामीण भागात या काळात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढते. कणकवली-कलमठ-आचरा हा प्रमुख संपर्कमार्ग असल्याने या मार्गावर दुचाकी, चारचाकी वाहने, एसटी बस तसेच पादचाऱ्यांची मोठी गर्दी होते.
या मार्गाची रुंदी अनेक ठिकाणी मर्यादित असून कलमठ बाजारपेठ, तीव्र वळणे आणि दाट मानवी वस्ती असलेल्या भागातून हा रस्ता जातो. त्यामुळे गणेशोत्सव काळात अवजड वाहतूक सुरू राहिल्यास वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
अवजड वाहने अरुंद रस्त्यावर समोरासमोर आल्यास वाहतूक अनेक तास ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. याचा फटका चाकरमानी, स्थानिक नागरिक आणि भाविकांना बसू शकतो. तसेच रस्त्यांवर लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ वाढत असल्याने अवजड वाहनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून मंगळवार, ८ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत कणकवली-कलमठ-आचरा मार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवावी, अशी मागणी सुप्रिया मेस्त्री यांनी केली आहे. भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा, असेही त्यांनी निवेदनातून म्हटले आहे.
Source link



