सिंधुदुर्ग राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीला; शेतकरी प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

सावंतवाडी : प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची डिचोली, गोवा येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह पक्षसंघटना बळकट करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती तसेच वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई वेळेत मिळत नसल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. विशेषतः नारळ आणि सुपारी पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्याबाबत पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन देत लक्ष घालण्याची मागणी केली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा
वन्यप्राण्यांकडून शेतीचे होणारे नुकसान, नुकसानभरपाई मिळण्यास होणारा विलंब तसेच शेतकऱ्यांच्या इतर प्रलंबित प्रश्नांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनस्तरावर या प्रश्नांची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
पक्षसंघटना बळकट करण्याबाबतही चर्चा
याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची संघटना अधिक मजबूत करण्याबाबतही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने पक्षाचे काम करण्याची तयारी व्यक्त केली.
यावेळी सुनेत्रा पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्यांच्या समस्या तसेच संघटनात्मक बाबींवर लक्ष देण्याचे आश्वासन दिले. तसेच पदाधिकाऱ्यांनी दर्जेदार पद्धतीने पक्षाचे काम सुरू ठेवावे, पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.
या भेटीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुरेश गवस, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष मेघेंद्र देसाई, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा जिल्हाध्यक्ष दीपक देसाई आणि सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष विजय कदम उपस्थित होते.
Source link



