Uncategorized

मळेवाडमधील रस्ता अडवणाऱ्या अतिक्रमणावर कारवाईची मागणी; भारती नाईक यांचा उपोषणाचा इशारा

सावंतवाडी / प्रतिनिधी : मळेवाड येथील सावंतवाडी-शिरोडा मार्गावरील अतिक्रमण हटविण्याबाबत वारंवार सूचना करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या भारती भालचंद्र नाईक यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. येत्या 18 सप्टेंबर रोजी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे त्यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

मळेवाड जंक्शन परिसरात रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करण्यात आले असून, त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आणि वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. अतिक्रमणामुळे रस्त्याची जागा अरुंद होत असून वाहतुकीच्या दृष्टीनेही समस्या निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या अतिक्रमणाबाबत ग्रामपंचायतीसह संबंधित विभागांना वारंवार माहिती देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचे नाईक यांनी सांगितले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे यासंदर्भात नोटीस देण्यात आली होती. त्याची दखल घेत विभागाने सदर अतिक्रमण हटविण्याचे आदेशही काढले होते. मात्र, अद्याप प्रत्यक्षात अतिक्रमण हटविण्यात आलेले नाही, असा आरोप त्यांनी केला.

अतिक्रमण हटविण्याचे आदेश होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे भारती नाईक यांनी निवेदनात नमूद केले आहे. गणेश चतुर्थीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच 18 सप्टेंबरला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन मळेवाड जंक्शन परिसरातील अतिक्रमण हटवावे आणि नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​