भारत-बेल्जियम संरक्षण सहकार्य करार

बेल्जियमच्या नेत्यांकडून भारताची प्रशंसा, द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत
महत्त्वाचे करार…
- संरक्षण साधने, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे यांच्या सहउत्पादनासाठी मोठा करार
- पुनउ&पयोगी ऊर्जा, तिची निर्मिती, तंत्रज्ञान विकासासाठी सहकार्य करार
- गुप्त माहितीचे आदान-प्रदान, संरक्षण प्रशिक्षण आणि सुरक्षाहिताचा करार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारत आणि बेल्जियम यांच्यात संरक्षण क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी महत्त्वाचा करार करण्यात आला आहे. याचा लाभ दोन्ही देशांना होणार असून भविष्यकाळात दोन्ही देशांचे परस्पर संबंध अधिक वृद्धिंगत होतील, असा विश्वास दोन्ही देशांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भारताच्या दौऱ्यावर आलेले बेल्जियमचे नेते बर्ट डी व्हिवर यांच्याशी द्विपक्षीय सहकार्यासंबंधी चर्चा केली. नंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे.
व्हिवर यांचे भारतात गुरुवारी आगमन झाले. दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. व्हिवर यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिवर यांनी एकमेकांशी विविध द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांसंबंधी विस्तृत चर्चा केली. दोन्ही देशांची प्रतिनिधी मंडळेही या चर्चेत सहभागी झाली. नंतर दोन्ही देशांनी त्यांच्यातील संरक्षण सहकार्य कराराला अंतिम स्वरुप दिले. हा करार दोन्ही देशांना जोडणारा एक सेतू आहे. भविष्यकाळात उत्कट सहकार्य होईल, अशी भलावण करण्यात आली आहे.
संयुक्त शस्त्रउत्पादन होणार
चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. संरक्षण आणि सुरक्षा करार हा दोन्ही देशांच्या सहकार्य वृद्धीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. संरक्षण विषयक माहितीचे आदान-प्रदान, संरक्षण तंत्रज्ञान विकास आणि संरक्षण प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करणार आहेत. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या तंत्रज्ञानाचा विकास आणि त्यांचे उत्पादन संयुक्तपणे करण्यास दोन्ही देशांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे दोन्ही देशांनी पुनउ&पयोगी ऊर्जा क्षेत्रासाठी करार केला. त्याअंतर्गत भारत ऊर्जा निर्मिती क्षेत्रात प्रगती करणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
भारताला जगभरात किंमत
भारताचे महत्त्व गेल्या काही वर्षांमध्ये जगात वाढले आहे. भारताचा आवाज आता केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेला नसून तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. सध्याच्या काळात जगात भारताच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले असून बेल्जियम देश भारताशी सहकार्य करण्यास सज्ज आहे. भारत आणि बेल्जियम यांच्यातील सहकार्याची वृद्धी होईल, असे प्रतिपादन व्हिवर यांनी केले.
आव्हानात्मक काळ
जग सध्या एका आव्हानात्मक कालखंडातून वाटचाल करीत आहे. जगाच्या अनेक भागांमध्ये सशस्त्र संघर्ष आणि युद्धे होत आहेत. काही युद्धे प्रदीर्घ काळापासून होत राहिलेली आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा साखळ्या तुटल्या आहेत. जगात अत्याधिक अस्थिरतेचे वातावरण आहे. या अत्यंत अस्वस्थ काळातही भारताने आर्थिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. पुरवठा साखळ्या तुटल्याने इंधन आणि अन्नधान्ये यांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. मोठ्या देशांवरही याचा विपरित परिणाम झालेला दिसतो. अशा जटील परिस्थितीतही भारताने अत्यंत समाधानकारक असा आर्थिक विकास साध्य केला आहे. भारताच्या यशाची ही कहाणी जगातील अनेक देशांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. भारताच्या यश हा जगासाठी आत्मविश्वास आणि संधी यांचा दरवाजा ठरला आहे. भारताच्या यशात सर्व नागरिकांचा सहभाग आहे, अशी भलावण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
महत्वाची भागिदारी
संरक्षण, पुनउ&पयोगी ऊर्जा निर्मिती आणि इतर करारांमध्ये दोन्ही देशांमध्ये एक अतूट भागिदारी निर्माण झाली आहे. प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी स्वच्छ ऊर्जेचा अखंड स्रोत विकसित झाला पाहिजे. भारत आणि बेल्जियम यांच्यातील भागिदारीचा हा समान धागा आहे, अशीही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
युरोपियन महासंघाशी संबंध महत्वाचे
भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यात झालेला मुक्त व्यापार करार हे भारताच्या आर्थिक मुत्सद्देगिरीचे यश आहे. या करारामुळे जगात स्थिरता वर्धिष्णू होणार आहे. तसेच सहभागित समृद्धताही निर्माण होणार आहे. अवघड काळात भारताने साध्य केलेल्या आर्थिक प्रगतीचे कौतुक आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांनीही केले आहे. भविष्यात भारत अनेक देशांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. 2047 पर्यंत विकसित होण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
Source link



