Uncategorized

आमदार क्षीरसागर वरिष्ठ नेते, नाराजीवर चर्चा करू; पक्ष वाढवायचा असेल तर एकमेकांना विश्वासात घेऊन काम करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: आमदार राजेश क्षीरसागर हे पक्षातील वरिष्ठ नेते आहेत. पक्षाच्या वाढीसंदर्भात काही उणीवा अथवा नाराजी असेल, तर सर्वांनी एकत्र येऊन त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी एकमेकांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह पक्षातील इतर सहकाऱ्यांशी आपण चर्चा करणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची अपेक्षित वाढ होत नसल्याची नाराजी व्यक्त करत अप्रत्यक्षपणे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर आबिटकर यांनी क्षीरसागर यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया देत पक्षांतर्गत समन्वयाची भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील ऐशीयन हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर राज्य सरकारने रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेचा मुद्दा गांभिर्याने घेतला आहे. राज्यातील सर्व शासकीय तसेच खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यासह आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील चार दिवसांत यासंदर्भातील एसओपी जारी करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री आबिटकर यांनी दिली. रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा यंत्रणेची दर सहा महिन्यांनी आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. साऊंड सिस्टीमच्या मुद्यावर बोलताना आबिटकर यांनी, गणेशोत्सव उत्साहात, जल्लोषात साजरा झाला पाहिजे. त्याचवेळी सार्वजनिक शांतता, कायदा सुव्यवस्था आणि नियमांचे पालन यांच्यात समतोल राखणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

शक्तिपीठ महामार्गावर संयमाचा सल्ला
शक्तिपीठ महामार्गाबाबत आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच कोणताही प्रकल्प पुढे नेला पाहिजे, आमदार क्षीरसागर आणि माजी खासदार शेट्टी यांच्यात सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना त्यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनाची अथवा विरोधाची भूमिका घेणे स्वाभाविक आहे. मात्र, हे दोन्ही नेते जबाबदार आहेत, त्यांनी राजकारणात अनेक वर्षे काम केले आहे. आपण सर्वांनी संयम पाळून काम केले पाहिजे, राजकीय भूमिका वेगळी आणि वैयक्तिक संबंध वेगळे असतात, असे मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.

राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर
कायदा-सुव्यवस्था आणि स्वतंत्र गृहमंत्रिपदाच्या मागणीवरून शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनाही आबिटकर यांनी प्रत्युत्तर दिले. विरोधक म्हणून खासदार संजय राऊत टीका करत असले, तरी मुख्यमंत्री फडणवीस हे गृहमंत्रिपदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत असल्याचे त्यांनी सांगितले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​