Uncategorized

गणेशोत्सवासाठी देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे नियोजन; 18 विसर्जन घाटांवर विशेष व्यवस्था, 7 वाहनतळ निश्चित

देवगड / वार्ताहर : आगामी गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवगड-जामसंडे शहरातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुरळीत वातावरण मिळावे, यासाठी देवगड-जामसंडे नगरपंचायतीने विविध उपाययोजनांचे नियोजन केले आहे. याबाबत सोमवारी विशेष सभा घेऊन संबंधित विभागांच्या समन्वयाने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील 17 प्रभागांमध्ये स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली असून, प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. पायवाटा, काँक्रीट रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी वाढलेले शेवाळ काढून ब्लिचिंग पावडरच्या सहाय्याने स्वच्छता करण्यात येत आहे.

शहरातील18 गणेश विसर्जन घाटांवर विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. विसर्जन घाटांकडे जाणारे पोहोच रस्ते, पायवाटा आणि परिसराची साफसफाई करण्यात येत असून, आवश्यक ठिकाणी ब्लिचिंग पावडरचा वापर केला जात आहे. विसर्जनाच्या दिवशी प्रत्येक घाटावर नगरपंचायतीचे कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. गणेशमूर्ती विसर्जनानंतर निर्माण होणारे निर्माल्य स्वतंत्र निर्माल्य कलशात जमा करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. धोकादायक आणि संवेदनशील विसर्जनस्थळी जीवरक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरातील बंद असलेले पथदिवे दुरुस्त करून गणेशोत्सवापूर्वी कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच उत्सवाच्या काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तातडीने सामोरे जाण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे.

गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरात 7 वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. आठवडा बाजाराच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष वाहतूक नियोजन करण्यात आले असून, देवगड-ब्राह्मणदेववाडी मार्गे एकेरी वाहतूक व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे.

वीजपुरवठा सुरळीत आणि अखंडित राहण्यासाठी महावितरणला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागामार्फत गरजेनुसार आरोग्य पथक नियुक्त करण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बाहेरून मागविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिनिधींनी शहरातून जाणाऱ्या राज्य मार्गालगत महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील धोकादायक झाडी व गवत कटाईचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले. तसेच रस्त्याच्या साईडपट्टीवर आवश्यकतेनुसार भराव टाकणे आणि रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सव हा आनंद, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असून, नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी, स्वच्छता व आरोग्य व्यवस्था सक्षम राहावी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी नगरपंचायतीमार्फत संबंधित सर्व विभागांच्या समन्वयाने पूर्वतयारी करण्यात येत आहे. स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​