‘आजोबा गणपती’चा कायापालट; सोलापुरात सांस्कृतिक महोत्सवाची जय्यत तयारी

सोलापूर : अखंड हिंदुस्तानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरच्या मानाच्या लाडक्या ‘आजोबा गणपती’ मंदिरात यंदा महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ‘सांस्कृतिक महोत्सव 2026′ आयोजित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आजोबा गणपती मंदिराचा कायापालट करण्यात येत असून, मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महोत्सवाच्या तयारीला वेग आला असून मंदिराच्या बाहेरील भागात रंगरंगोटीचे काम सुरू आहे. तसेच मंदिराच्या आतील भागातील कामांनाही गती देण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर आणि आजूबाजूच्या रस्त्यांवर विविध सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे.
यंदाच्या वर्षी मंदिराबाहेरील रस्त्यांवर भव्य 20 फुटी मंडप उभारण्यात आले आहेत. या मंडपांमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आकर्षक वातावरण तयार होणार असून, कार्यक्रमांना मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
या सांस्कृतिक महोत्सवात ‘संगीत रंजना’, ‘गीत रामायण’ आणि ‘रंग महाराष्ट्राचे’ यांसारख्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध कला आणि संस्कृतीचे दर्शन या कार्यक्रमांच्या माध्यमातून सोलापूरकरांना घडणार आहे.
आजोबा गणपती मंदिराला असलेली ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा लक्षात घेता यंदाचा सांस्कृतिक महोत्सव विशेष ठरणार आहे. मंदिराचा झालेला कायापालट, भव्य मंडप आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी यामुळे सोलापूरकरांमध्ये महोत्सवाची आतुरता वाढली आहे.
Source link



