Tukaram Mundhe | तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील नामांकित हॉटेल्स, बेकऱ्यांवर मोठी कारवाई

मुंबई -अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी जसा पदभार सांभाळला आहे… तसे ते अॅक्शन मोडवर पाहायला मिळत… राज्यभरात अनेक ठिकाणी धाडी टाकल्या असुन आता त्यांची नजर ही मुंबईतील बड्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स,बेकऱ्यांवर पडली आहे… त्यांनी सोमवारी मुंबईतील तब्बल ६ बड्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकऱ्यांवर थेट लायसन्स निलंबनाची कारवाई केली. मुंढे यांच्या या दणक्यामुळे मुंबईतील बड्या हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
काय आहे प्रकरण…?
एफडीएच्या पथकाने २७ जून रोजी नरिमन पॉइंट येथील ‘फ्लिंट अँड वार्सा’ या रेस्टॉरंटची तपासणी केली. या तपासणीत अन्नपदार्थांच्या चुकीच्या ब्रँडिंगसह अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला. तसेच बोरीवली येथील एम. के. बेकरीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असतानाही अन्न उत्पादन सुरू असल्याचे आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आल्याने त्या ठिकाणीही कारवाई करण्यात आली. याशिवाय भांडुप, सांताक्रूझ आणि वांद्रे परिसरातील काही आस्थापनांवरही एफडीएने कारवाईचा बडगा उगारला.
दरम्यान, अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जाणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे. संशयास्पद किंवा निकृष्ट दर्जाचे अन्न विकले जात असल्यास नागरिकांनी तातडीने १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
या कारवायांच्या पार्श्वभूमीवर एफडीए अधिकारी असल्याचे भासवून एका हॉटेलवर धाड टाकल्याची धक्कादायक घटना देखील समोर आली आहे. बोरीवली पश्चिम येथील ‘आहार’ हॉटेलमध्ये दोन जणांनी स्वतःला एफडीए अधिकारी असल्याचे सांगत अन्न नमुने तपासणीच्या नावाखाली कारवाईची धमकी दिली. त्यांनी ‘Food Corporation of India’चे बनावट ओळखपत्र दाखवल्याचा आरोप हॉटेल मालकाने केला आहे. संशय आल्याने हॉटेल मालकाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. चौकशीनंतर संबंधित दोघेही बनावट अधिकारी असल्याचे समोर आले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न आणि औषध प्रशासन विभागावर गेल्या काही महिन्यांत भ्रष्टाचार, लाचखोरी आणि गैरव्यवहाराचे आरोप झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तुकाराम मुंढे यांची अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यांनी २५ मे रोजी पदभार स्वीकारल्यानंतर विभागातील शिस्त, पारदर्शकता आणि अन्न सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यावर भर दिला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही आस्थापनाला पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांच्या सलग कारवायांमधून दिला जात आहे.
Source link



