Radhanagari wildlife census | राधानगरी अभयारण्यात ‘रानगव्यां’चा दबदबा; बुद्ध पौर्णिमेच्या प्रगणनेत ६७ गव्यांची नोंद

राधानगरी अभयारण्यात वन्यप्राणी गणना यशस्वी
राधानगरी -१ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने वन विभागाच्या वतीने राधानगरी अभयारण्यात पाणवठ्यांवर आयोजित करण्यात आलेली वन्यप्राणी प्रगणना उत्साहात व यशस्वीरित्या पार पडली. या प्रगणनेत रानगव्यांसह सांबर, अस्वल, भेकर, साळींदर यासह अनेकविध १३४ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली.
या प्रगणनेच्या निमित्ताने अभयारण्यातील जैवविविधतेचेसमृद्ध चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. या प्रगणनेसाठी राधानगरी येथे २८ व दाजीपूर अभयारण्यात १४ मचाने उभीकरण्यात आली होती. या प्रगणना काळात एकूण १३४ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये ६० नर, ३१ मादी, १२ पिल्ले आणि ३१ अनोळखी प्राण्यांचा समावेश आहे. गव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यात रानगव्यांची सर्वाधिक ६७ इतकी संख्या नोंदविण्यात आली असून हा प्राणी अभयारण्याचे प्रमुख आकर्षण असल्याचे अधोरेखित झाले. याशिवाय शेकरू (६). हरीयाल पक्षी (३), सांबर (४), मोर (११), अरवल (८),रानकोंबडा (१४), रानकुत्रा (३). साळींदर (७), धनेश (२), भेकर (२), मुंगूस (२). रानमांजर (१) आणि रानडुक्कर (२) यांसारख्या विविध प्रजातींची नोंद झाली. तसेच ब्राम्हणी पतंग (Brahminy Kite) या पक्ष्याचाही समावेश या प्रगणनेत करण्यात आला, अशी माहिती विभागीय अधिकारी श्रीकांत पवार व वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांनी दिली.
या उपक्रमात वनविभागाचे अधिकारी, वनपाल, वनरक्षक, वनमजूर तसेच स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. या प्रगणनेतून राधानगरी अभयारण्यातील वन्यजीवांची संख्या व विविधता समाधानकारक असल्याचे दिसून आले असून, वनसंवर्धनाच्या दृष्टीने ही बाब सकारात्मक मानली जात आहे. ‘अनोळखी’ वन्यप्राणी पाणवठ्यांवर ठराविक वेळेत निरीक्षण करून ही गणना करण्यात आली. काही प्राणी ओळखणे कठीण गेल्यामुळे त्यांची नोंद ‘अनोळखी” या वर्गात करण्यात आल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.
Source link



