Uncategorized

भारतीय क्रिकेटमध्ये दुखापतींचे मोठे संकट; बुमराह, हार्दिकसह तेरा खेळाडू जखमी

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघावर सध्या दुखापतींचे मोठे संकट ओढावले आहे. संघाच्या सध्याच्या तसेच भविष्यातील योजनांमध्ये असलेले तब्बल 13 खेळाडू एकाच वेळी दुखापतींमुळे बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (CoE) पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वैद्यकीय पथकाकडून या खेळाडूंच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, मैदानावर पुनरागमनासाठी त्यांच्यावर उपचार आणि पुनर्वसन सुरू आहे.

श्रीलंका दौऱ्यातही दुखापतींमुळे काही महत्त्वाचे खेळाडू भारतीय संघासोबत नसल्याने हे संकट संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचे कारण ठरले आहे.

बुमराह, हार्दिकसह प्रमुख खेळाडूंचा समावेश

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, नितीश कुमार रेड्डी, साई सुदर्शन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासह आकाशदीप, हिमांशू सिंह, अशोक शर्मा, सुयश शर्मा, युद्धवीर सिंह आणि रियान पराग हे खेळाडू सध्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आहेत.

कोणाला कोणती दुखापत?

जसप्रीत बुमराह : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेतून बाहेर पडल्यानंतर बुमराह 30 जुलै रोजी सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दाखल झाला. त्याच्या डाव्या गुडघ्याच्या सांध्यात समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याला बाहेर ठेवण्यात आले आहे. सध्या तो स्ट्रेंथ आणि कंडिशनिंगवर काम करत असून, त्याच्या पुनरागमनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

हार्दिक पंड्या : हार्दिकला डाव्या मांडीच्या क्वाड्रिसेप्समध्ये दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने स्किल-बेस्ड सरावात चांगली प्रगती केली होती. तो 80 ते 90 टक्के वेगाने आठवड्याला 12 ते 15 षटके गोलंदाजी करत होता. मात्र, यादरम्यान त्याच्या उजव्या शिनमध्ये वेदना सुरू झाल्या. तपासणीत गंभीर समस्या आढळली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून त्याची धावण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली होती; आता ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

नितीश कुमार रेड्डी : डाव्या मांडीच्या दुखापतीतून नितीश वेगाने सावरत असून त्याने ‘रिटर्न टू स्किल्स’ टप्प्यात प्रवेश केला आहे. मागील आठवड्यात त्याने 16 षटके गोलंदाजी केली. त्याचा धावण्याचा वेग वाढवण्याचे प्रशिक्षण सुरू आहे.

साई सुदर्शन : सुदर्शनने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा सराव सुरू केला आहे. त्याने नेट्समध्ये 75 मिनिटे फलंदाजी केली असून धावण्याचा सरावही केला आहे. मात्र, दुखापत झालेल्या पायाच्या अंगठ्यात अद्याप वेदना आहेत. दोन दिवसांच्या फलंदाजी आणि रनिंग सेशननंतर एमआरआयद्वारे त्याच्या पुढील प्रगतीचे मूल्यांकन केले जाणार आहे.

हर्षित राणा : उजव्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे हर्षित सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आहे. 20 जुलै रोजी तो तेथे दाखल झाला. पुनर्वसनासोबतच त्याचा स्किल-बेस्ड सरावही सुरू करण्यात येत आहे.

वॉशिंग्टन सुंदर : सुंदरच्या उजव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली आहे. त्याने जॉगिंग सुरू केली असून कंडिशनिंग एक्सरसाइजवर भर दिला जात आहे. त्याच्या स्ट्रेंथ आणि बॅलन्समध्ये सुधारणा दिसत आहे. आगामी काळात त्याचा वर्कलोड हळूहळू वाढवून पुनरागमनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

वरुण चक्रवर्ती : वरुणच्या डाव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली आहे. सध्या तो स्पॉट बॉलिंगमध्ये सहा षटके गोलंदाजी करत आहे. पुढील सत्रात फलंदाजांविरुद्ध आठ षटके गोलंदाजी करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर वेगाने धावणे, दिशा बदलणे आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग यावर भर दिला जाणार आहे.

आकाशदीप : पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्यामुळे आकाशदीप मैदानापासून दूर होता. त्याने ‘रिटर्न टू प्ले’ कार्यक्रमात चांगली प्रगती केली असून प्राथमिक पुनर्वसन पूर्ण करून तो क्रिकेटशी संबंधित वर्कलोडकडे वाटचाल करत आहे.

हिमांशू सिंह : मुंबईचा वेगवान गोलंदाज हिमांशू सिंह उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आहे. 28 जुलैपासून त्याने स्पॉट बॉलिंग सुरू केली असून त्याला कोणतीही अडचण जाणवलेली नाही. आगामी आठवड्यांत त्याचा गोलंदाजी आणि प्रशिक्षणाचा भार हळूहळू वाढवण्यात येणार आहे.

अशोक शर्मा : 13 खेळाडूंमध्ये अशोक शर्माची दुखापत सर्वाधिक गंभीर मानली जात आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर त्याच्या पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना जाणवल्या. एमआरआय आणि सीटी स्कॅनच्या प्रतिमा न्यूझीलंडमधील स्पाइन तज्ज्ञ डॉ. रोवन यांच्याकडे पाठवण्यात आल्या. तपासणीत एल१ पार्स इंटरआर्टिक्युलिसमध्ये अॅक्यूट स्ट्रेस फ्रॅक्चर तसेच डाव्या ११व्या बरगडीत फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुयश शर्मा : मागील आयपीएलनंतर गोलंदाजी न केलेल्या सुयशच्या दोन्ही गुडघ्यांमध्ये ‘पटेलर इन्सर्शनल टेंडिनोपॅथी’ आढळली होती. प्राथमिक उपचारांचा अपेक्षित फायदा न झाल्याने 28 जुलै रोजी त्याला पीआरपी इंजेक्शन देण्यात आले. सध्या तो संरचित पुनर्वसन प्रक्रियेत असून गुडघ्यांची ताकद वाढवण्यावर काम सुरू आहे.

युद्धवीर सिंह : युद्धवीरच्या उजव्या खांद्याच्या दुखापतीत आता मोठी सुधारणा झाली आहे. तो संपूर्ण शरीराच्या स्ट्रेंथ ट्रेनिंगसोबत खांद्यासाठी पुनर्वसनाचे व्यायाम करत आहे. मात्र, त्याला मैदानावर परतण्यासाठी आणखी काही काळ लागू शकतो.

रियान पराग : उजव्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर रियान पराग सध्या पुनर्वसन घेत आहे. त्याने स्ट्रक्चर्ड स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कार्यक्रम सुरू केला आहे. मात्र, फलंदाजी किंवा गोलंदाजी सुरू करण्यासाठी अद्याप कोणतीही निश्चित कालमर्यादा देण्यात आलेली नाही.

भारतीय संघातील तब्बल १३ खेळाडू एकाच वेळी दुखापतींशी झुंज देत असल्याने बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकासमोर खेळाडूंना पूर्णपणे तंदुरुस्त करून मैदानावर परत आणण्याचे मोठे आव्हान आहे.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​