शिवानंद निलण्णावरच्या घरांवर ईडीचे छापे

बेळगाव, हुक्केरी, चिकोडीतील निवासस्थानांसह आप्तेष्टांचीही चौकशी
बहुचर्चित शिवम असोसिएट्सचा सर्वेसर्वा शिवानंद निलण्णावर याच्या निवासस्थानावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी छापे टाकले आहेत. शिवानंद व त्याच्या पत्नीची चौकशी करण्याबरोबरच हुक्केरी, चिकोडी येथील आप्तेष्टांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले.
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : माळमारुती पोलिसांनी बड्स कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करून शिवानंदला अटक केली होती. 5 टक्के परताव्याचे आमिष दाखवून त्याने शेकडो कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे. सध्या हे प्रकरण सीआयडीकडे असतानाच शुक्रवारी ईडीनेही चौकशी सुरू केली आहे. शिवबसवनगर येथील एका अपार्टमेंटमधील निवासस्थानावर मंगळूर व गोव्याहून आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. शिवानंद व पत्नी संगीताची चौकशी करण्यात आली असून आणखी काही आप्तेष्टांचीही आर्थिक व्यवहारासंबंधी चौकशी झाली आहे. बडकुंद्री, ता. हुक्केरी येथील त्याच्या निवासस्थानावरही तपासणी झाली आहे.
अधिकाऱ्यांनी शिवानंदच्या मेहुण्याचीही चौकशी केली आहे. शिवबसवनगर येथील शिवम असोसिएट्समध्ये सुमारे 40 हजारहून अधिक जणांनी शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अलीकडेच उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर कारागृहातून त्याची सुटका झाली आहे.
15 मे रोजी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या आदेशावरून प्रांताधिकारी श्रवणकुमार नायक यांच्यासह पोलीस, महसूल व सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी शिवम असोसिएट्सवर छापा टाकून आर्थिक व्यवहारासंबंधी त्याला टाळे ठोकले होते. आता या प्रकरणात ईडीचीही चौकशी सुरू झाली आहे.
चिकोडी-हुक्केरी तालुक्यात छापे
चिकोडी : ‘शिवम असोसिएट्स’चे व्यवस्थापकीय संचालक सुभाष नंदरगी यांच्या चिकोडी येथील घरावर ईडीच्या पथकाने छापा टाकला आहे. हुक्केरी तालुक्यातील बडकुंद्री गावात शिवानंद यांची पत्नी संगीता यांच्या घरावरही धाड टाकण्यात आली आहे. सध्या ईडीचे अधिकारी पत्नी संगीता आणि शिवानंद यांचा मेहुणा संजू यांची चौकशी करत आहेत. ही कारवाई बेंगळूर- गोवा येथील ईडीच्या पथकांने केली.
Source link



