Manglwedha news | मंगळवेढा हादरले! पोटच्या दोन चिमुकल्यांना वाचवताना आईचाही अंत; साठवण तलावात बुडून तिघांचा मृत्यू

खडकी गावात आईसह १० आणि १२ वर्षांच्या मुलांची जलसमाधी
मंगळवेढा -मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावात शनिवारी सकाळच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. साठवण तलावात बुडून आईसह दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये वैशाली अनिल घोडके (वय ३५), श्रेया अनिल घोडके (वय १२) आणि सोहम अनिल घोडके (वय १०) यांचा समावेश आहे.
वैशाली घोडके या आपल्या दोन मुलांसह गावाजवळील साठवण तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी दोन्ही मुले त्यांच्या मागोमाग तलावाच्या काठावर गेली. मात्र, पाण्याचा योग्य अंदाज न आल्याने मुले अचानक खोल पाण्यात गेली आणि बुडू लागली. मुलांना वाचवण्यासाठी आई वैशाली घोडके यांनीही तलावात उडी घेतली. परंतु दुर्दैवाने त्या देखील पाण्यात बुडाल्या. ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने तिघांना बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे घोडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रशासनाकडून घटनेची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
Source link


