Gadhinglaj News | गडहिंग्लजमध्ये एकीकडे काटकसरीचे परिपत्रक, तर दुसरीकडे लाखो लीटर पाणी वाया; पाहा प्रशासनाचा ‘हा’ अजब कारभार!

गडहिंग्लज -एकीकडे शासनाकडून पाणी टंचाईचे धोरण स्पष्ट करत काटकसरीने पाणी वापरावे लागणार असे परिपत्रक काढले आहे. तर दुसरीकडे पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गडहिंग्लज शहरात लाखो लीटर पाणी वाया गेल्याचे चित्र समोर अल्याने संताप व्यक्त होत आहे. पाणी कपातीचे धोरण राबवण्याची वेळ आल्यानंतर देखील शहरातील भडगाव मार्गावरील रस्त्याच्या कामासाठी ठेकेदराकडून काढण्यात आलेल्या खुदाईत मुख्य जलवाहिनी फुटून लाखो लीटर पाणी वाया गेल्याचे चित्र दिसून आले.
मंगळवारी दुपारी जवळपास तीन तासाहून अधिक वेळ रस्त्यावरून पाणी वाहून ऐन उन्हाळ्यात मुख्यरस्त्यावर तळ्याचे स्वरूप दिसून आले. यामुळे पाणीपुरवठा खंडित झाल्याने पुन्हा भडगाव मार्गावरील कॉलनी, वसाहतीमध्ये काल देखील पाणी आले नसल्याने सोशल मीडियावर प्रशासनाच्याविरोधात ‘मीम्स’ पहायला मिळाले. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच प्र. नगराध्यक्ष महेश सलवादे, नगरसेवक गुंडू पाटील, विठ्ठल भमानगोळ, आण्णासाहेब देवगोंडा, जल अभियंता विकास वाघवेकर यांनी घटनास्थळी ठेकेदाराला बोलावून परिस्थिती दाखवली.
तरपाणीपुरवठा सुरळीत करेपर्यंत या ठिकाणीहून ठेकेदारांना हालू देणार नाही असा सज्जड दम दिल्यानंतर जेसीबी आणि इतर कर्मचारी लावून दुरूस्तीचे काम सुरू झाले. जवळपास आठ तासाहून अधिक कालावधीनंतर जलवाहिनीचे जोडण्याचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.
भडगाव रोडवर फक्त गळतीच
रस्त्याच्या कामात नळपाणी पुरवठा करणाऱ्या पाईप फुटत असल्याचे चित्र समोर येत आहे. ठेकेदार आणि पालिका प्रशासनात समन्वय नसल्याचा तोटा नागरिकांना होत आहे. भडगाव रोडवरील विविध कॉलनी, नगरात सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने संतापाची भावना व्यक्त होत आहेत.
Source link



