मालवणात रोटरी क्लब व लिमये हॉस्पिटलतर्फे बीएमडी तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण : रोटरी क्लब मालवण आणि लिमये हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज मालवण येथे Bone Mineral Density (BMD) तपासणीचे शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून दिवसभरात एकूण १५५ रुग्णांची मोफत बीएमडी तपासणी करण्यात आली.
हाडांच्या ठिसूळपणाचे (ऑस्टिओपोरोसिस) लवकर निदान व्हावे आणि नागरिकांमध्ये हाडांच्या आरोग्याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तपासणीनंतर प्रत्येक रुग्णाला त्यांचा बीएमडी तपासणी अहवाल त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्याची सुविधा देण्यात आली, त्यामुळे रुग्णांना भविष्यातही आपला अहवाल सहज पाहता येणार आहे.
या शिबिरात ज्या रुग्णांच्या बीएमडी तपासणीचे निष्कर्ष सकारात्मक (Positive) आले, अशा रुग्णांना डॉ. अजित लिमये यांनी आवश्यक औषधोपचार, आहार, व्यायाम तसेच पुढील उपचारांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रो.डॉ. लीना लिमये व डॉ. अजित लिमये यांच्यासह प्रदीप सामंत, महादेव पाटकर, अभय कदम, रमाकांत वाक्कर , अमरजीत वणकुद्रे , यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच रोटरी क्लब मालवणच्या अध्यक्षा सौ. नीलम जोशी आणि सचिव सौ. प्रविणा शिंदे यांनी नियोजन व समन्वयाची प्रभावी जबाबदारी सांभाळून शिबिराच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब मालवण आणि लिमये हॉस्पिटल यांच्याकडून भविष्यातही अशा समाजोपयोगी आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले.
Source link



