Asha Bhosle | स्वरांचे लेणे अन् मायेची ओढ; चिखलीच्या पांडबा यादवांच्या घरी आशाताईंनी जपली 20 वर्षांची मैत्री

आशाताई अन् चिखलीच्या ‘यादव’ कुटुंबाचे अतूट नाते
चिखली (सुधाकर काशिद ) – करवीर तालुक्यातील चिखली हे गाव . या गावातील यादव परिवार आणि त्यांचे गुऱ्हाळ याच्याशी आशाताई भोसले यांचे गोड नाते गेली वीस वर्षाहून अधिक काळ होते . त्यांच्या गुऱ्हाळावर मंगेशकर परिवार दरवर्षी येत होता . काही काही वेळा लता मंगेशकर त्यांच्या एकूण व्यापामुळे नसायच्या .पण आशा भोसले ताईंनी या गुऱ्हाळावरचा गूळ आणि पांढऱ्या तांबड्या रश्याचा पाहुणचार कधीच चुकवला नाही .
चिखलीतील पांडबा यादवांचे हे गुऱ्हाळ म्हणजे मंगेशकर परिवाराचे हक्काचे होते . वर्षातून एकदा हा परिवार या गुऱ्हाळावर येणार म्हणजे येणार हे ठरूनच गेलेले होते.या परिवारातील जनार्दन यांना आज या आठवणी सांगताना त्यांचा भरून आला . सगळ्या जगात आशाताईंचा सूर एक आश्चर्य मानले जात होता . आणि आशाताईंचा स्वर त्या दर्जाचा होताच पण आमच्या दृष्टीने त्याचे महत्त्व असे की आशाताई व मंगेशकर परिवार आमच्याशी गप्पा मारायला यायचा .नेहमी सुरात गाणाऱ्या ताईंच्या शब्दाला येथे सुरांची नव्हे तर मायेची आणि स्नेहाची जोड असायची . आणि त्या बोलत राहायच्या . आमच्या कुटुंबातील काही जणांची चेष्टा करायच्या . पण आमच्या कुटुंबात चार ते पाच तासाहून अधिक काळ मनापासून रमून जायच्या .
विशेष:आशाताईंच्यासाठी बैलगाडीतून फेरफटका ठरलेलाच असायचा . त्यांना बैलगाडीत बसवून प्रयाग जवळ असलेल्या दत्ताच्या देवळापर्यंत न्यायचे व तेथून परत आणायचे हे ठरूनच गेले होते. त्यानंतर रस,गरम गुळाची चव व घरात खास कोल्हापुरी पांढरा तांबडा याचा बेत तयारच असायचा . आशाताई आमच्या चुलीजवळ जेवायला बसायच्या .आणि गप्पा मारत चक्क फरशीवर मांडी घालून बसायच्या . गायिका आशा भोसले म्हणून त्या कधीच आमच्या घरात वावरल्या नाहीत .आमच्या यादव परिवाराचा घटक म्हणूनच त्या आमच्या कुटुंबात रमून जात होत्या .आज त्यांच्या निधनाचे वृत्त कळाले आणि प्रतिक्रिया देण्यासही आमच्याकडे त्यांच्या तोडीचे शब्द नाही उरले .
यादव कुटुंबातील पांडबा, विठ्ठल, मोहन, मेजर विलास, विश्वास, राजन आणि जनार्दन हे सातही भाऊ आशाताईंना आपली बहीणच मानत होते . आज त्यांच्या निधनानंतर आमच्याकडे श्रद्धांजलीला शब्द नाहीत एवढेच ते बोलताना वारंवार म्हणत होते .
Source link

