Uncategorized

अखेर युनियन जिमखान्याला सील – Tarun Bharat

गोळीबार प्रकरणानंतर लष्कर-कॅन्टोन्मेंटची संयुक्त कारवाई : सशस्त्र लष्करी जवानांसह पोलिसांचाही सहभाग

बेळगाव : युनियन जिमखाना येथील रमी क्लबमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबाराच्या घटनेची गंभीर दखल घेत संरक्षण खात्याच्या बेंगळूर डीईओ कार्यालय आणि बेळगावच्या कॅन्टोन्मेंट बोर्डकडून अखेर गुरुवारी युनियन जिमखान्याला सील ठोकण्यात आले. ही कारवाई करताना स्थानिक पोलिसांसह सशस्त्र लष्करी जवान व लष्करी पोलिसांची मदत घेण्यात आली. युनियन जिमखान्याच्या आवारात सुरू असलेल्या रमी क्लबमध्ये मंगळवारी रात्री शिरलेल्या बंदूकधारी हल्लेखोरांनी सुरेश जालगार याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. शिताफीने त्याने आपली सुटका करून घेतली.

मात्र, हल्लेखोरांनी हवेत गोळीबार केला. यावेळी झालेल्या झटापटीत एक जिवंत काडतूसही घटनास्थळी पडले. अचानक हल्ला करण्यासह हवेत गोळीबार करण्यात आल्याने  एकच खळबळ उडाली. पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या युनियन जिमखाना येथील क्लबमध्ये गोळीबाराची घटना घडल्याने पोलीस आयुक्त भूषण बोरसे, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमनी यांच्यासह कॅम्पच्या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली. या प्रकरणी कॅम्प पोलीस स्थानकात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. जुगार व्यवसायातील वर्चस्ववादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वी प्रफुल्ल पाटील या गॅम्बलरवर बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या बेनकनहळ्ळी येथील पेट्रोल पंपनजीक गोळीबार करण्यात आला होता. याच पूर्ववैमनस्यातून प्रफुल्ल पाटील व त्याच्या सहकाऱ्यांनी आपल्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद सुरेश जालगार याने कॅम्प पोलीस स्थानकात दिली आहे. तर  काही जणांनी साहित्याची नासधूस केल्याची फिर्याद युनियन जिमखान्याच्या व्यवस्थापकांनीही दिली आहे. सदर गोळीबाराची घटना पोलीस खात्याने अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. युनियन जिमखान्याची जागा कॅन्टोन्मेंट बोर्डची असून त्याचे लीज संपले आहे. तसेच रमी क्लबही बेकायदेशीररीत्या चालविला जात होता, असे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकारांशी बोलताना यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

ही बाब आता लष्करानेही गांभीर्याने घेतली आहे. युनियन जिमखान्याचा कब्जा घेण्यासाठी लष्कराच्या बेंगळूर येथील डीईओ ऑफिसमधील अधिकारी गुरुवारी बेळगावात दाखल झाले. त्यांनी कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून युनियन जिमखान्याचा कब्जा घेतला. यावेळी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी सशस्त्र लष्करी जवानांना तैनात करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. गुरुवारी युनियन जिमखान्याला सील ठोकले जाणार असल्याने पोलीस खात्याकडून देखील घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यासह इतर कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यात आले. क्लबचे वीजकनेक्शन तोडण्यासह तेथील फलकही ताब्यात घेण्यात आले. मुख्य गेटला सील ठोकण्यात आले असून त्या ठिकाणी लष्करी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दोन विशेष तपास पथकांची स्थापना

गोळीबाराच्या घटनेचा तपास करण्यासाठी दोन विशेष तपास पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मुख्य संशयित प्रफुल्ल पाटील व त्याच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी कसून प्रयत्न चालवले आहेत. प्रफुल्ल पाटील व त्याच्या सहकाऱ्यांचे मोबाईल स्वीचऑफ असल्याने त्यांचे लोकेशन समजणे कठीण जात आहे. ज्या दिवशी गोळीबाराची घटना घडली, त्या दिवशी प्रफुल्ल पाटील याचा मोबाईल बेनकनहळ्ळी गावातून स्वीचऑफ झाला आहे. त्यानंतरचे पुढील लोकेशन सापडत नसल्याचे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

खेळाडूंवर मोठा परिणाम होण्याची शक्यता

युनियन जिमखान्याचा गुरुवार दि. 16 रोजी ताबा घेणार असल्याची नोटीस 10 रोजी दिल्याचे सांगितले जात असले तरी आपल्याला नोटीस मिळालीच नाही. चिकटवण्यात आलेल्या नोटिसीवरील तपशील प्रिंटेड असून तारीख मात्र हाताने लिहिण्यात आली आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असून अद्याप न्यायालयाने निकाल दिलेला नाही. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेचा फायदा उठवत ही कारवाई करण्यात आली आहे. शहरातील युनियन जिमखाना हे एकमेव मैदान असून तेही गेले तर खेळाडूंवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

-प्रसन्ना सुंठणकर, सेक्रेटरी युनियन जिमखाना

संरक्षण विभागाने परत घेतला युनियन जिमखान्याचा भूखंड,डीईओ दिव्या होसूर यांची माहिती

येथील सुप्रसिद्ध युनियन जिमखान्याचा जवळपास 6.4 एकर क्षेत्रफळ असणारा भूखंड आता संरक्षण विभागाने स्वत:च्या आधिनत्वात घेतला आहे. संरक्षण विभागाच्यावतीने कर्नाटक विभागाच्या संरक्षण मालमत्ता विभागाच्या डीईओ दिव्या होसूर यांनी ही माहिती एका निवेदनाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे. 2002 मध्येच या भूखंडाचा भाडे कालावधी (लीज पिरियड) संपला होता. तथापि, युनियन जिमखाना या संस्थेने हा भूखंड तेव्हापासून बेकायदेशीररित्या स्वत:च्या ताब्यात ठेवला होता. मात्र, आता संरक्षण विभागाने आपली ही भूमी पुन्हा आपल्याकडे घेतली आहे, अशी माहिती दिव्या होसूर यांनी या निवेदनाद्वारे प्रसिद्ध केली आहे. या भूमीसाठी गेली 23 वर्षे संरक्षण विभागाने न्यायालयीन संघर्ष केला आहे.

हे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड पीठाकडे हाताळणीसाठी प्रलंबित होते. 6 एप्रिल 2026 या दिवशी उच्च न्यायालयाने युनियन जिमखाना या संस्थेची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे या भूमीवर संरक्षण विभागाचेच स्वामित्व आहे, ही बाब सिद्ध झाली आहे. त्यानंतर संरक्षण विभागाने उच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाला अनुसरुन ही भूमी आपल्या ताब्यात घेण्यासंबंधी प्रक्रिया चालविली होती. दिव्या होसूर यांनी ही प्रक्रिया पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. बेळगाव शहर पोलीस कमिशनर, त्यांचा पोलीस विभाग आणि बेळगाव कॅन्टोन्मेंट विभाग यांनी या कामी संरक्षण विभागाला सक्रिय सहकार्य केले आहे. आता ही मालमत्ता सील करण्यात आली असून तिला सुरक्षा सैनिकांनी वेढले आहे. अशाप्रकारे ही भूमी आता कायदेशीररित्या पुन्हा संरक्षण विभागाच्या आधीन झालेली आहे, असे होसूर यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​