सोलापुरात गोपीचंद पडळकरांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला; पडळकरांनी स्पष्ट केली आपली भूमिका

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोलापुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ताफ्याला मराठा आंदोलकांनी अडवून त्यांच्याकडे आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. कामती येथे हा प्रकार घडला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आमदार पडळकर यांचा ताफा अडवून त्यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. तसेच मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी पडळकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. “ज्या मराठ्यांची कुणबी म्हणून नोंद आहे, त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले. मात्र, खाडाखोड करून अथवा चुकीच्या नोंदी करून कुणबी दाखले घेण्यास आपला विरोध असल्याचेही पडळकर यांनी स्पष्ट केले.
चुकीच्या पद्धतीने कुणबी नोंदी करून दाखले घेतल्यास त्याचा परिणाम संपूर्ण समाजाच्या प्रतिमेवर होतो. “यामुळे संपूर्ण समाजाला बदनामीला सामोरे जावे लागते,” असे पडळकर म्हणाले.
दरम्यान, “मराठा समाजाच्या भावना आमच्याही आहेत. आम्ही मराठा समाजासोबत आहोत,” अशी भूमिका गोपीचंद पडळकर यांनी यावेळी मांडली. त्यांच्या भूमिकेनंतर आंदोलकांशी काही काळ चर्चा झाली.
Source link



