नंबरप्लेट नसलेल्या दुचाकींची तपासणी

दंडात्मक कारवाई करून दिले सोडून, 105 हून अधिक दुचाकीस्वारांवर कारवाई
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : नंबरप्लेट नसलेली दुचाकी अडवून तपासणीची मोहीम राबविण्यात आली. यासाठी गुरुवारी वाहतूक पोलिसांची संपूर्ण यंत्रणा कामाला लावण्यात आली होती. पोलिसांनी दिवसभरात 105 हून अधिक नंबरप्लेट नसलेल्या दुचाकी अडवून कागदपत्रांची पडताळणी केली आहे.
पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. गुरुवार दि. 23 जुलै रोजी संपूर्ण शहरात नंबरप्लेट नसलेली किंवा नंबरप्लेट असूनही कॅमेऱ्यांची नजर चुकविण्यासाठी लपविण्यात आलेल्या दुचाकी अडवून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. 105 हून अधिक दुचाकीसंबंधीची कागदपत्रे पडताळून चालकांना समज देण्यात आली. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.
सध्या दंडात्मक कारवाई करून सुटका करण्यात आली आहे. यापुढे नंबरप्लेट नसलेली व सदोष नंबरप्लेट असलेली वाहने अडवून त्यांच्यावर मोटारवाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालक व मालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
Source link



