श्रावणातील सण-परंपरांचा जागर; वडाचापाट हायस्कूलमध्ये ‘श्रावणधारा’ उत्साहात

मालवण : भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण), मुंबई संचलित श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल, वडाचापाट येथे मराठी विषयांतर्गत आयोजित करण्यात आलेला ‘श्रावणधारा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
श्रावण महिन्यातील विविध सण, उत्सव आणि पारंपरिक प्रथा-परंपरांचे दर्शन विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्कारातून घडविले. यावेळी कविता, लेख, एकपात्री अभिनय, मंगळागौरी, हरिनाम सप्ताह यांसह नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आणि जन्माष्टमी या सणांचे सादरीकरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्याबरोबरच भारतीय संस्कृती आणि परंपरांची ओळखही विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.
संस्थेचे सहखजिनदार अर्जुन अभिमन्यू कवठणकर यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो तसेच त्यांच्या सांस्कृतिक जाणीवा अधिक समृद्ध होतात, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मराठी विषयाच्या शिक्षिका प्रतिभा केळूसकर यांनी केले. यावेळी शिक्षिका वेदिका दळवी, अन्वी पाटकर, महेश गावडे यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
Source link



