“मुरूम जिल्ह्यासाठी कार्यकर्ते आक्रमक; धाराशिवमधून स्वतंत्र जिल्ह्याच्या मागणीचा एल्गार!”

धाराशिव-उमरगा : राज्यातील निवडणुकांचा धुराळा खाली बसल्यानंतर आता धाराशिव जिल्ह्यात नवीन जिल्हा निर्मितीची मागणी जोर धरू लागली आहे. उमरगा तालुक्यातील कर्नाटक सीमेलगत असलेल्या मुरूम परिसराला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सिद्धलिंग हिरेमठ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
धाराशिव, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यांच्या जवळ असलेल्या मुरूम परिसराचा भौगोलिक तसेच प्रशासकीयदृष्ट्या स्वतंत्र विचार करून ‘मुरूम जिल्हा’ निर्माण करावा, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली आहे. स्वतंत्र जिल्ह्याची निर्मिती झाल्यास सीमावर्ती भागातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होईल आणि नागरिकांना शासकीय सेवा-सुविधा सहज उपलब्ध होतील, असा दावा त्यांनी केला आहे.
मुरूम परिसराची वाढती लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती आणि कर्नाटक सीमेलगतचे महत्त्वाचे स्थान लक्षात घेता स्वतंत्र जिल्ह्याची आवश्यकता असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तसेच धाराशिव, लातूर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या जवळ असलेल्या या भागासाठी स्वतंत्र प्रशासकीय व्यवस्था निर्माण झाल्यास स्थानिक विकासाला अधिक गती मिळू शकते, असा दावा करण्यात आला आहे.
सध्या विविध प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना मोठ्या अंतराचा प्रवास करावा लागत असल्याने स्वतंत्र जिल्ह्यामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचेल, तसेच शासनाच्या विविध योजना आणि सुविधा तळागाळापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होईल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मुरूम जिल्हा निर्मितीचा मुद्दा आगामी काळात अधिक तीव्र करण्याचा निर्धार सिद्धलिंग हिरेमठ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या मागणीसाठी व्यापक जनजागृती आणि आंदोलन उभारण्याच्या दिशेने पुढील काळात पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.
Source link



