Uncategorized

गुरुपौर्णिमेला दशावतार गुरु-शिष्य परंपरेचा जागर

सावंतवाडी /प्रतिनिधी : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत फरा प्रतिष्ठान, आदर्शगाव केर आणि स्नेहबंध ग्रुप, दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दशावतारातील गुरु-शिष्य परंपरा वृद्धिंगत करणारा’ विशेष कार्यक्रम बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत शिल्पग्राम, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून सुमारे ५० वर्षांपूर्वीच्या दशावतार कलेचा खडतर प्रवास, त्यामागील मेहनत आणि सुवर्णक्षणांचा जिवंत अनुभव रसिकांना घेता येणार आहे. आजच्या आधुनिक साधनसामग्रीच्या युगात सहज उपलब्ध होणाऱ्या सुविधा पूर्वी नव्हत्या. त्या काळात कलाकार पुराणांचा अभ्यास कसा करायचे, कोणते संदर्भग्रंथ वापरले जात, रंगभूषा, रंगकाम, प्रवास, संवादांची तयारी, गाजलेली पदे आणि संस्मरणीय प्रसंग कशा पद्धतीने साकारले जात होते, याचा उलगडा या कार्यक्रमातून ज्येष्ठ कलाकारांच्या अनुभवातून होणार आहे. त्यामुळे नवोदित कलाकारांना दशावताराच्या समृद्ध परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन दत्तमाऊली पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग आणि हेळेकर दशावतार नाट्य मंडळ, कारीवडे यांच्याकडून करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी दशावतार क्षेत्रातील ऋषितुल्य, गुरुतुल्य ज्येष्ठ कलावंत मंगेश राणे, सुरेश गुरव, राधाकृष्ण उर्फ बाबली नाईक, संतोष रेडकर आणि आनंद नार्वेकर यांचा पाद्यपूजनाने गौरव करण्यात येणार आहे. त्यानंतर ‘५० वर्षांपूर्वीचा दशावतार : खडतर प्रवास ते सोनेरी क्षण’ या विषयावर विशेष मुलाखत रंगणार असून, युवा कलाकार दत्तप्रसाद शेणई हे ज्येष्ठ कलाकारांशी संवाद साधणार आहेत.

याच कार्यक्रमात दशावतार स्मृती कलागौरव पुरस्काराने कै. रामचंद्र बाबुराव राणे उर्फ बाबा राणे-कोनसकर यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात येणार असून, त्यांच्या दशावतार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाला अभिवादन केले जाणार आहे.

कार्यक्रमाच्या विशेष आकर्षणामध्ये ज्येष्ठ कलाकारांकडून त्यांच्या गाजलेल्या व रसिकप्रिय भूमिका सादर केल्या जाणार आहेत. तसेच काही दमदार युवा कलाकारांकडून निवडक प्रसंगांचे सादरीकरण होणार आहे. त्यामुळे दशावतारप्रेमी, नवोदित कलाकार आणि रसिकांनी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन फरा प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​