गोलरक्षकाने इराणला तारले, बेल्जियमविरुद्ध गोलशून्य बरोबरी

विश्वचषकातील सर्वोत्तम ठरू शकेल असा ‘सेव्ह’ करणारा इराणचा गोलरक्षक अलिरेझा बेइरानवंड
वृत्तसंस्था, इंग्लवूड, कॅलिफोर्निया : इराणचा या विश्वचषकातील प्रवास मैदानाबाहेरील घडामोडींमुळे अत्यंत अस्थिर राहिला आहे आणि मैदानावरही त्यांना अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही. तरीही, विश्वचषकाच्या बाद फेरीत पहिल्यांदाच प्रवेश करण्याचे इराण संघाचे स्वप्न अजूनही जिवंत आहे. याचे श्रेय बेल्जियमविऊद्धच्या सामन्यात गोलरक्षक अलीरेझा बेइरानवंडने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीला जाते, ज्यामुळे सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.
गोलरक्षकांच्या अनेक अविस्मरणीय कामगिरींनी गाजलेल्या या विश्वचषकात बेइरानवंडने बेल्जियम संघाचे गोल करण्याचे सात प्रयत्न उधळून लावत स्वत:चे नाव या यादीत कोरले. दुसऱ्या सत्राच्या सुऊवातीला मॅक्सिम डी कुइपरने अगदी जवळून मारलेला फटका जमिनीवर पडलेल्या स्थितीत असताना एका हाताने रोखण्याची त्याची कामगिरी स्पर्धेतील सर्वोत्तम बचावांपैकी एक ठरेल. तसेच 86 व्या मिनिटाला डी कुइपरला मिळालेली सुवर्णसंधीही बेइरानवंडने पुन्हा एकदा हाणून पाडली.
मात्र, ऐतिहासिक विजय मिळवून देणारा गोल इराणच्या इतर खेळाडूंना करता आला नाही. विशेषत: बेल्जियमचा संघ दुसऱ्या सत्रात 10 खेळाडूंसह खेळत असतानाही त्यांना ही संधी साधता आली नाही. 66 व्या मिनिटाला बेल्जियमचा बचावपटू नॅथन एनगोय याला थेट ‘रेड कार्ड’ मिळाले. त्याने चेंडू चुकीच्या पद्धतीने मागे मारला आणि त्यानंतर इराणचा स्टार खेळाडू मेहदी तारेमीला गोल करण्याची संधी मिळण्यापासून रोखण्यासाठी फाऊल केला. सामन्याच्या उत्तरार्धात बेल्जियमने गोल करण्याच्या अधिक चांगल्या संधी निर्माण केल्या आणि एकूण 23 फटके हाणले. तरीही दोन्ही संघांना गट फेरीतील सलग दुसऱ्या बरोबरीवर समाधान मानावे लागले.
Source link



