Uncategorized
Pandharpur News | अधिक महिन्यामध्ये नो-पार्किंग, वॉकर झोनचे उल्लंघन

राज्यासह परराज्यातून वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूक कोंडीची समस्या
पंढरपूर : पांडुरंग नगरी विठुरायाच्या दर्शनासाठी अधिक महिन्यानिमित्त पंढरपूरमध्ये राज्यासह परराज्यातून वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत चालली आहे. शहरातील नो-पार्किंग झोनचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पंढरपूर शहरातील व्यापारी वर्गाने फुटपाथ व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात केलेल्या अतिक्रमणामुळे अनेक ठिकाणी प्रमुख रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी तसेच रिक्षा अशा वाहनांची बेकायदेशीर पार्किंग होत असून यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
शहरातील विठ्ठल मंदिर प्रदक्षिणामार्ग, महाद्वार चौक, गजानन महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड, नगरपरिषद पंढरपूर समोर व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.
भाजी मंडई आणि विठ्ठल मंदिराकडे जाणारे पंढरपूर शहरातील मुख्य रस्त्यावर नो पार्किंग झोन ठिकाणी अनधिकृत पार्किंग व व्यापारी वर्गाने फुटपाथ वर अतिक्रमण केल्यामुळे वॉकर झोन नियमांचे उल्लंघन होत आहे. पंढरपूर शहर परिसरातील रस्त्यांवर वाहतूक नियमांनुसार आखण्यात आलेल्या पांढऱ्या व पिवळ्या पट्ट्या अनेक ठिकाणी पूर्णपणे पुसल्या गेल्या आहेत.
त्यामुळे वाहनचालकांना पार्किंग आणि नो-पार्किंग क्षेत्राची स्पष्ट माहिती मिळत नसल्याने नियमांचे उल्लंघन वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याशिवाय पायी चालणाऱ्या भाविक, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक कोंडी व अपघात होऊ नये म्हणून उभारण्यात आलेले वॉकर झोन फलकावर अनधिकृत बॅनर लावण्यात आलेले आहेत.
वॉकर झोन फलक अनेक ठिकाणी कमी प्रमाणात आणि अदृश्य झाले आहेत. पंढरपूर शहराच्या मध्यभागी चौफाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर फेरीवाले, हातगाडी गाडी, ज्यूस हातगाडे, व्यापारी लोकांनी मोठ्या प्रमाणात फुटपाथवर केलेल्या अतिक्रमणामुळे परिणामी भाविक भक्त, पादचाऱ्यांना रस्त्यावरूनच मार्ग काढावा लागत असून वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका वाढला आहे.
विशेषतः अधिक मास महिन्यामध्ये पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते. अशा वेळी वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी अधिक ठळकपणे समोर येत आहेत. नो-पार्किंग झोनमध्ये उभी राहणारी वाहने, अस्पष्ट रस्ते चिन्हे आणि गायब फलक यामुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
Source link



