मालवण आगारात एसटीचा ७८ वा वर्धापन दिन

अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी मित्रांच्या उपस्थितीत रंगला सोहळा
मालवण : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच कोकण एसटी प्रेमी ग्रुपच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त मालवण आगार येथे उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. एसटी सेवा ही ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी जीवनवाहिनी असून तिच्या गौरवशाली प्रवासाचा आढावा यावेळी घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालवण आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी होते. यावेळी स्थानक प्रमुख स्वप्नील गडदे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सतीश वाळके, विभागीय लेखा अधिकारी सुवर्णा दळवी, लिपिक दिलीप हिंदळेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे सदस्य व प्रवासी मित्र अनंत शांताराम सामंत, प्रणिता गुरुदास कावले यांच्यासह अनेक एसटी प्रेमींनी कार्यक्रमात सहभाग घेतला.यावेळी एसटी महामंडळाने गेल्या ७८ वर्षांत बजावलेल्या सामाजिक भूमिकेचा गौरव करण्यात आला. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वसामान्यांच्या सेवेत एसटीचे योगदान मोलाचे असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. कोकण एसटी प्रेमी ग्रुपने गेल्या दशकभरात एसटीबाबत जनजागृती, प्रवाशांच्या समस्या मांडणे आणि महामंडळाविषयी सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी केलेल्या कार्याचाही गौरव करण्यात आला.कार्यक्रमास अधिकारी वर्ग, वाहन परीक्षक, यांत्रिक कर्मचारी, सुरक्षा रक्षक, प्रवासी तसेच एसटी सेवेशी निगडित अनेक मान्यवर उपस्थित होते. एसटी ही केवळ वाहतुकीचे साधन नसून जनतेच्या भावनांशी जोडलेली सेवा आहे, असा संदेश या वर्धापन दिन सोहळ्यातून देण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये एसटी सेवेविषयी अभिमान आणि आपुलकीची भावना अधिक दृढ झाली.
Source link



