कर्नाटकात सत्तेचा नवा अध्याय

डी. के. शिवकुमार मुख्यमंत्रिपदी विराजमान : डॉ. परमेश्वर उपमुख्यमंत्री : 12 आमदार कॅबिनेट मंत्रिपदी शपथबद्ध
बेंगळूर : दीर्घकालीन प्रतीक्षेनंतर राज्य काँग्रेसमधील प्रभावी नेते आणि ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाणारे डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी कर्नाटकाचे 25 वे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री म्हणून डॉ. जी. परमेश्वर तसेच बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे सतीश जारकीहोळी यांच्यासह 12 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. अशाप्रकारे कर्नाटकात काँग्रेस सरकारचे नवे पर्व सुरू झाले असून पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह 14 जण शपथबद्ध झाले आहेत. आता खातेवाटपाकडे राजकारण्यांचे लक्ष लागले आहे.
बेंगळूरमधील लोकभवनमध्ये आयोजित समारंभात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शिवकुमार यांनी तुमकूरच्या तिपटूर तालुक्यातील नोणविनकेरे येथील काडसिद्धेश्वर मठाच्या गंगाधर अज्जय्या यांच्या नावे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्या हातात संविधानाची प्रत होती हे विशेष. शपथग्रहणापूर्वी त्यांनी व्यासपीठावर ठेवलेल्या अज्जय्या यांच्या फोटोला पुष्पार्पण केले.
डॉ. जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या नावाने शपथ घेतली. त्यांच्यापाठोपाठ कॅबिनेट मंत्री म्हणून के. एच. मुनियप्पा, के. जे. जॉर्ज, एम. बी. पाटील, रामलिंगारे•ाr, सतीश जारकीहोळी, कृष्णभैरेगौडा, प्रियांक खर्गे, यु. टी. खादर, ईश्वर खंड्रे, डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या, भैरती सुरेश, डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी शपथग्रहण केले.
कर्नाटकात 2023 मध्ये काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर हायकमांडच्या उपस्थितीत झालेल्या ‘अडीच वर्षे’ या सूत्रानुसार पहिल्या टप्प्यात सिद्धरामय्या मुख्यमंत्री बनले होते. तीन वर्षे पदभार सांभाळल्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या सूचनेवरून त्यांनी मागील आठवड्यात राजीनामा दिला होता. नंतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत डी. के. शिवकुमार यांची विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यातील नव्या मंत्रिमंडळाचे स्वरुप निश्चित करण्यासाठी मागील तीन दिवसांपासून दिल्लीत खलबते झाल्यानंतर बुधवार 3 जून रोजी मुख्यमंत्री, एक उपमुख्यमंत्री आणि 13 कॅबिनेट दर्जाचे मंत्री असे एकूण 14 जण शपथबद्ध झाले.
उत्तर कर्नाटकातून पाच जणांना संधी
मुख्यमंत्र्यांसह नव्या मंत्रिमंडळात 14 जणांचा समावेश झाला आहे. उत्तर कर्नाटकासाठी पाच मंत्रिपदे मिळाली आहेत. कल्याण कर्नाटक भागात तीन म्हणजेच कलबुर्गी जिल्ह्यातून दोघांचा तर बिदर जिल्ह्यातून दोघांना मंत्रिपदे मिळाली आहेत. बेळगाव व विजापूर जिल्ह्यातून प्रत्येकी एकाला मंत्रिपद मिळाले आहे. उर्वरित मंत्रिपदे दक्षिण कर्नाटकाला मिळाली आहेत. त्यातही सर्वाधिक प्राधान्य बेंगळूर शहर जिल्ह्याला मिळाले आहे. बेंगळूर शहर जिल्ह्याला चार, बेंगळूर ग्रामीण, म्हैसूर, तुमकूर आणि मंगळूर जिल्ह्यासाठी प्रत्येकी एक आणि मुख्यमंत्र्यांच्या रुपाने मंत्रिमंडळात बेंगळूर दक्षिण जिल्ह्यासाठी एक जागा मिळाली आहे.
शपथविधी सोहळ्याला कोणाकोणाची उपस्थिती…
काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राज्य काँग्रेस प्रभारी के. सी. वेणुगोपाल, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रे•ाr, केरळमचे मुख्यमंत्री सतीशन, राज्याचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद, मोहम्मद अझरुद्दीन, राजीव शुक्ला यांच्यासह प्रमुख नेते राज्यातील विविध मठाधीश, मौलवी, चर्चचे प्रमुख, विविध राज्यांतील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, खासदार-आमदान, सिनेकलाकार व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते.
अखेर डॉ.परमेश्वर याना उपमख्यमंत्रीपद
बुधवारी मुख्यमंत्र्यांबरोबर केवळ कॅबिनेट मंत्री शपथग्रहण करतील, अशी चर्चा होती. मात्र, अखेरच्या क्षणी पाच वेळा आमदार असलेले, सलग दोन टर्ममध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सांभाळलेल्या आणि सिद्धरामय्या सरकारमध्ये गृहमंत्रिपदाची भूषविलेल्या डॉ. जी. परमेश्वर यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ घालण्यात आली आहे. सिद्धरामय्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवकुमार यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारमध्ये दलित, अल्पसंख्याक आणि लिंगायत समुदायातील प्रत्येकी एकाला उपमुख्यमंत्रिपद देण्याची मागणी झाली होती. मात्र, मागील तीन दिवसांत झालेल्या चर्चेवेळी उपमुख्यमंत्री नेमण्याबाबत काँग्रेस हायकमांडने राज्य नेत्यांना कोणतीही सुगावा लागू दिला नाही. अखेर बुधवारी दुपारी उपमुख्यमंत्री नेमण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार अनुसूचित जातीतील डॉ. जी. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्री बनविण्यात आले आहे. आगामी काळात आणखी उपमुख्यमंत्रिपदे निर्माण केली जातील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
तुमच्यासोबत केंद्र सरकार आहे!
कर्नाटकाचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होत असलेले डी. के. शिवकुमार यांचे अभिनंदन. त्यांच्या अधिकारअवधीसाठी शुभेच्छा. केंद्र सरकार जनतेच्या कल्याणासाठी कर्नाटक सरकारसोबत मिळून काम करेल. तुमच्यासोबत केंद्र सरकार आहे.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान
सोनिया गांधींकडून शुभेच्छा
काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी डी. के. शिवकुमार यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. तुम्ही कर्नाटकाचे नेतृत्व यशस्वीपणे कराल, असा मला पूर्ण विश्वास आहे. सर्वांना सोबत घेऊन पुढे चला. तुमचे भविष्य उज्ज्वल असेल, अशा शब्दात सोनिया गांधींनी डी. के. शिवकुमार यांना शुभेच्छा दिल्या.
तुषार गिरीनाथ मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव
वरिष्ठ आयएएस अधिकारी तुषार गिरीनाथ यांची नूतन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे अप्पर मुख्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यावर नगरविकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तुषार गिरीनाथ यांनी यापूर्वी बेंगळूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम केले होते. तसेच आयएएस अधिकारी राजेंद्र चोळण यांची मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यावर केपीसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार म्हणून आयएएस अधिकारी एल. के. अतिक यांची नेमणूक करण्यात आली आहे.
Source link



