सिंधुदुर्गातील पाडलोस ठरली प्रथम बालस्नेही ग्रामपंचायत

मडुरा पंचायत द्वितीय तर वैभववाडी तालुक्यातील कुसुर पंचायत तृतीय
न्हावेली /वार्ताहर
महाराष्ट्रातील तब्बल २७ हजार ९५१ ग्रामपंचायतींपैकी केवळ १०२ ग्रामपंचायतींची ‘बालस्नेही पंचायत’ म्हणून निवड करण्यात आली असून त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींनी मानाचे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरावरही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मडुरा ग्रामपंचायतीने द्वितीय तर वैभववाडी तालुक्यातील कुसुर ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळविला आहे. बालस्नेही गाव म्हणून राज्यस्तरावर निवड झाल्यानंतर यशदा पुणे तसेच युनिसेफ आणि बालहक्क आयोग मार्फत बालसभेचे पाडलोस ग्रामपंचायत सभागृहात आयोजन करण्यात आले होते. मार्गदर्शन करण्यासाठी यशदा पुणेचे मास्टर ट्रेनर नारायण परब उपस्थित होते. यावेळी सरपंच सलोनी पेडणेकर, उपसरपंच राजू शेटकर, ओम गणेश बालसभा अध्यक्ष सानिका गावडे, सचिव गौतमी केणी, कोषाध्यक्ष साईश नाईक, समुदाय आरोग्य अधिकारी तेजस्विनी माजगावकर, पोलिस पाटील रश्मी माधव, सीएलएफ मॅनेजर प्रचिती मडुरकर, मळेवाड प्रभाग संघाचे सीसी अनुप देऊलकर, आरोग्यसेविका करिष्मा राऊळ, बीआरपी प्राची राऊळ, आरोग्यसेवक सुरेश कांबळे, ग्रामसेवक प्रतिभा आळवे, आशा सेविका विजया गावडे, अंगणवाडी सेविका तनुजा कुबल, अश्विनी साळगावकर, मुख्याध्यापक विजय गावडे, ग्राम संघाच्या अध्यक्ष मयुरी हरिजन, सचिव संगीता गावडे, सीआरपी नेहा नाईक, लिपिका शितल गावडे, मयुरी कुबल, पाडलोस सोसायटी व्हाइस चेअरमन विश्वनाथ नाईक, कृषी सहायक वैभव ननवरे, ग्रामपंचायत सदस्य रोशनी गावडे, उद्यान महाविद्यालय मुळदेचे विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते. बालसभेत गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच बालसभा समिती सदस्य निवड केले. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील सभेत अभंग स्पर्धा, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक प्रतिभा आळवे यांनी केले. स्वागत ओम गणेश बालसभेच्या पदाधिकाऱ्यांनी केले, तर प्रास्ताविक विश्वनाथ नाईक यांनी केले. आभार बालसभा अध्यक्ष सानिका गावडे यांनी मानले.
राज्यात 102 ग्रामपंचायतीत पाडलोस ग्रामपंचायतीने स्थान मिळवणे हे मोठे यश आहे व तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. सिंधुदुर्गात प्रथम क्रमांक मिळविण्यात ओम गणेश बालसभा पदाधिकारी व पालकांचे महत्त्वाचे योगदान आहे.
– श्रीधर पाटील, तहसीलदार, सावंतवाडी
राज्यातही प्रथम येण्यासाठी प्रयत्नशील : परब
बालसभेच्या माध्यमातून शाश्वत विकासाची १७ उद्दिष्टे साध्य करण्याचे ध्येय आहे. गरिबी निर्मूलन, उपासमारमुक्त समाज, दर्जेदार शिक्षण, सुदृढ आरोग्य, स्वच्छता, लिंग समानता आणि बालहक्कांचे संरक्षण यावर विशेष भर देण्यात येत आहे. बालकांचे एकूण ५४ हक्क असून त्यांची प्रभावी अंमलबजावणी ही प्रत्येक गावाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व नियमांचे काटेकोर पालन करून पाडलोस ग्रामपंचायतीने राज्यातही प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन नारायण परब यांनी केले.
Source link



