Uncategorized

सावंतवाडी नगरपरिषदेत ग्रो बीग कंपनीच्या मुदतवाढीला नकार

सांडपाणी प्रकल्पावर प्रशासनाला खडेबोल, विषयसूचीत गोंधळाने सभागृह तापले

सावंतवाडी : प्रतिनिधी

सावंतवाडी नगरपरिषदेच्या बुधवारी झालेल्या मासिक सभेत ग्रो बीग टेक्नॉलॉजी कंपनीला जिमखाना मैदानावरील बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनीतील खोली वापरण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे सत्ताधारी भाजपने आपली राजकीय भूमिका ठामपणे मांडत प्रतिष्ठा राखल्याची चर्चा सभागृहाबाहेर रंगली. दुसरीकडे शहराच्या अस्मितेशी निगडित असलेल्या सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर प्रकल्पाबाबत प्रशासनाने पुरेसा पाठपुरावा न केल्याचा आरोप करत उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. याशिवाय विषयसूचीत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या प्रती देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सभागृहात मोठा गोंधळ उडाला.

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर, विविध सभापती, नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या. सभेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. मात्र ग्रो बीग टेक्नॉलॉजी कंपनीच्या मुदतवाढीचा प्रस्ताव, सांडपाणी प्रकल्प, शिल्पग्रामची थकीत अनामत रक्कम, व्यापारी संकुलातील भाडेवाढ आणि विषयसूचीत झालेला गोंधळ हे विषय केंद्रस्थानी राहिले.

ग्रो बीग कंपनीच्या मुदतवाढीवरून जोरदार चर्चा

ग्रो बीग टेक्नॉलॉजी कंपनीने बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनीतील खोली सुरुवातीला पंधरा दिवसांसाठी भाड्याने घेतली होती. त्यासाठी सुमारे पन्नास हजार रुपये भाडेही भरले होते. या ठिकाणी कंपनीमार्फत युवकांना प्रशिक्षण दिले जात होते. मात्र कंपनीला आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सभागृहासमोर आल्यानंतर त्यावर जोरदार चर्चा रंगली.

शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी सध्याच्या काळात युवकांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न असल्याचे सांगितले. युवकांना रोजगार मिळणे कठीण झाले असून एखादी कंपनी रोजगाराच्या संधी निर्माण करत असेल तर त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत व्यक्त करत त्यांनी कंपनीला मुदतवाढ देण्याची सूचना केली.

यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक देवा टेमकर यांनी आक्षेप घेतला. या ठिकाणी नेमके कोणते काम चालते, कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते याची स्पष्ट माहिती सभागृहाला उपलब्ध नाही. त्यामुळे प्रथम संपूर्ण माहिती सभागृहासमोर ठेवण्यात यावी आणि त्यानंतर पुढील सभेत निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आनंद नेवगी यांनी कंपनीच्या संचालकाने पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्ष आणि नगरपरिषदेची बदनामी केल्याचा आरोप केला. यापूर्वी याच ठिकाणी कार्यरत असलेल्या एका कंपनीने युवकांचे पगार थकवले होते. त्यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी पुढाकार घेत संबंधितांचे पगार दिले होते. नगरपरिषदेची प्रतिमा मलिन करणाऱ्या संस्थेला मुदतवाढ देणे योग्य ठरणार नाही, असे ते म्हणाले.

काँग्रेसचे नगरसेवक तौकीर शेख यांनीही कंपनीविरोधात भूमिका घेतली. यापूर्वी या कंपनीने एका समाजाच्या इमारतीतील हॉल वापरला होता. त्या ठिकाणी बांधकामाची तोडफोड झाल्याचे आरोप झाले होते. तसेच एका कर्मचाऱ्याने समाजाच्या पदाधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची तयारी केल्याचा प्रकारही घडला होता. अशा प्रकारच्या वादग्रस्त घटनांचा विचार करता नगरपरिषदेच्या दृष्टीने ही बाब धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.

दीर्घ चर्चेनंतर हा प्रस्ताव मतदानासाठी घेण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाचे अजय गोंदावळे यांनी केली. मात्र अखेरीस सभागृहाने मुदतवाढीचा प्रस्ताव नामंजूर केला. या चर्चेत माजी नगराध्यक्ष संजू परब आणि आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनीही सहभाग घेतला.

विषयसूचीत गोंधळ; विरोधक आक्रमक
सभेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो विषयसूचीत झालेला गोंधळ. विरोधकांकडे असलेल्या विषयसूचीत नऊ विषय होते, तर सत्ताधाऱ्यांकडे दहा विषयांची यादी असल्याचे समोर आले. ग्रो बीग टेक्नॉलॉजीच्या मुदतवाढीच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला.

माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. विरोधकांना आणि सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या प्रती कशा देण्यात आल्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नगराध्यक्ष विषयसूचीवर वीस सह्या करू शकतात तर मुख्याधिकाऱ्यांना सह्या करायला अडचण काय, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रशासनावर टीका केली.

“आम्ही लोकांतून निवडून आलेले नगरसेवक आहोत. आम्हाला साधी झेरॉक्स प्रत का दिली जाते?” असा सवालही त्यांनी केला. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी यापुढे अशी चूक होणार नसल्याचे स्पष्ट केले.

नंतर सभागृहात कामांच्या यादीचे वाचन सुरू असताना नगरसेविका सुनिता पेडणेकर यांनी दहा कामांचे वाचन केले. त्यावर संजू परब यांनी आपल्या यादीत केवळ नऊ कामे असल्याचे सांगत दहावे काम अचानक कसे आले, असा प्रश्न उपस्थित केला. आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त काम समाविष्ट केल्याचे सांगितले. त्यावर विरोधकांनी पुन्हा आक्षेप घेतला.

सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पावर प्रशासनाला जाब
सावंतवाडी शहराच्या भविष्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर प्रकल्प हा सभेतील आणखी एक प्रमुख विषय ठरला. यासंदर्भात मागील तीन मासिक सभांमध्ये ठराव मंजूर झाले होते. मात्र त्यानंतर प्रशासनाकडून कोणताही ठोस पाठपुरावा होत नसल्याचा आरोप उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केला.

या विषयावर बोलताना त्यांनी प्रशासनाला खडेबोल सुनावले. “शहराच्या अस्मितेचा प्रश्न असलेल्या प्रकल्पाकडे इतक्या हलक्यात का पाहिले जात आहे? प्रशासनाला याचे गांभीर्य नाही का?” असा सवाल त्यांनी केला.

मुख्याधिकाऱ्यांनी उत्तर देणे अपेक्षित असताना सभापती आनंद नेवगी आणि सुधीर आडिवरेकर यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला. यावेळी संजू परब यांनी उत्तर मुख्याधिकाऱ्यांनीच द्यावे, अशी मागणी केली.

मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सीशी संपर्क साधल्याचे सांगितले. त्यावर अधिकृत पत्रव्यवहार सभागृहात सादर करण्याची मागणी करण्यात आली. मात्र संपर्क फोनवरून झाल्याचे उत्तर देण्यात आले. यामुळे उपनगराध्यक्ष निरवडेकर अधिकच संतप्त झाले. हा प्रकल्प प्रशासनाकडून हलक्यात घेतला जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

नगरसेवक अजय गोंदावळे यांनीही या प्रकल्पाला समर्थन देत सावंतवाडीच्या विकासासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. अखेरीस नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल, असे आश्वासन दिले.

महिलांसाठी गाळा स्थानिकांना देण्याची मागणी
शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका शर्वरी धारगळकर यांनी इंदिरा गांधी संकुलातील महिला बचत गटासाठी राखीव असलेल्या गाळ्याचा मुद्दा उपस्थित केला. संबंधित गाळा शहराबाहेरील महिलेला चालवण्यासाठी देण्यात आल्याचा आरोप करत तो स्थानिक महिलेला देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी माहिती घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

शिल्पग्रामच्या थकीत अनामत रकमेवरून सवाल
सभेत आयत्यावेळीच्या विषयात माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी शिल्पग्राम प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला. प्रकल्प चालवण्यासाठी संबंधित व्यक्तीने सुमारे दीड कोटी रुपयांची अनामत रक्कम भरणे अपेक्षित असताना केवळ तीस लाख रुपये भरले गेल्याचा आरोप करण्यात आला. गेल्या दहा वर्षांत उर्वरित रक्कम जमा करण्यात आलेली नाही.

आपण नगराध्यक्ष असताना यासंदर्भात नोटीस बजावली होती. मात्र आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नगरपरिषदेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असे परब यांनी सांगितले. संबंधितांकडून व्याजासह रक्कम वसूल करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर मुख्याधिकारी औंधकर यांनी तत्काळ नोटीस बजावून रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे सांगितले.

व्यापारी संकुलातील थकीत भाड्याचा प्रश्न
इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांकडून वाढीव भाडे आणि प्रीमियम वसूल करण्यात आले नसल्याचा मुद्दाही सभेत उपस्थित करण्यात आला. २०१९ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या समितीने भाडेवाढ आणि प्रीमियम आकारण्याची सूचना केली होती. मात्र अद्याप कोणतीही वसुली झाली नसल्याने नगरपरिषदेचे सुमारे ९३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला.

यावर मुख्याधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि आमदारांनी भाडेवाढीला स्थगिती दिली होती. आता पाच सदस्यीय समिती स्थापन होणार असून ती अंतिम निर्णय घेईल, असे स्पष्ट केले.

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
नगरसेविका ॲड. सायली दुभाषी यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाचा मुद्दा मांडला. नागरिकांना कुत्र्यांकडून त्रास होत असून नुकसानभरपाईच्या मागण्या नगरसेवकांकडे येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर मुख्याधिकाऱ्यांनी दोन कोटी रुपयांच्या शेल्टर प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविल्याची माहिती दिली. तसेच कुत्रे पकडणाऱ्या पथकांची संख्या वाढविण्यात येईल, असे आश्वासन दिले.

आयुर्वेद ओपीडीसाठी जागा देण्याचा निर्णय सभेतील सकारात्मक निर्णयांपैकी एक म्हणजे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा यांच्या ओपीडीसाठी नगरपरिषदेमार्फत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय. हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी या निर्णयाचे स्वागत करत तो शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांचे अभिनंदन केले.

पोस्ट खात्याच्या कुंपणाचा मुद्दाही चर्चेत
नगरसेवक अजय गोंदावळे यांनी नगरपरिषदेच्या २६ गुंठे जागेभोवती पोस्ट खात्याने कुंपण घातल्याचा मुद्दा उपस्थित केला. ही जागा नगरपरिषदेच्या ताब्यात घेण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

नगराध्यक्षांचा अभिमान-संजु परब

सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत भाजप , शिवसेना शिंदे गट स्वतंत्र लढले होते त्यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी तेव्हा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असलेल्या श्रद्धाराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. श्रद्धाराजे भोसले नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. सुरुवातीच्या काही सभेत नगराध्यक्ष भोसले यांना संजू परब खिंडीत पकडत होते. परंतु बुधवारी झालेल्या मासिक सभेत संजू परब यांनी श्रद्धाराजे भोसले या आमच्या प्रभागातीलच आहेत त्यामुळे त्यांचा मला अभिमान असल्याचे सांगत नगराध्यक्षांनी प्रभागाच्या समस्यांकडे ही लक्ष द्यावे असे स्पष्ट केले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​