शुभम सिदनाळेचा अजयवर प्रेक्षणीय विजय

सांबरा कुस्तीगीर कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने भव्य कुस्ती मैदान : कामेश पाटील, प्रेम जाधव, दर्शन सांबरा विजयी
बेळगाव : सांबरा कुस्तीगीर कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने निकाली भव्य कुस्ती मैदानात महाराष्ट्राच्या शुभम सिदनाळेने पाचव्या मिनिटाला सवारी भरून एकेरी हाताच्या कस चढवित अजय वरणला असमान दाखविले तर कामेश पाटील कंग्राळीने करण दिल्लाला अवघ्या मिनिटात उलटी डावावरती चारीमुंड्या चित करुन उपस्थित कुस्ती शौकीनांची मने जिंकली. प्रमुख कुस्ती हिंदू गर्जना केसरी ग्रीक रोमन महाराष्ट्र केसरी, शुभम सिदनाळे, व भारत केसरी, सोनीपत हरियाणाचा मल्ल अजय वरण ही कुस्ती डॉ. अमित चिंगळे, मल्लाप्पा मोगलाई, नागेश चौगुले, इराप्पा जुई व सांबरा कुस्तीगिरी संघटनेच्यावतीने लावण्यात आली.
पहिल्याच मिनिटाला शुभम सिदनाळने एकेरीपट काढून अजय वरणला खाली घेत घिस्सा फिरविण्याचा प्रयत्न केला. पण घिस्सावर न फिरल्याने मानेचा कस काढून घुटणा डावावरती चित करण्याचा प्रयत्न केला. पण खालून दशरंग डावाने अजय वरणने त्यातून सुटका करून घेतली. तिसऱ्या मिनिटाला एकेरीपट काढून अजयला खाली घेतले. व पायाची एकलांगी भरून तोंडाला नाकपट्टी लावून फिरविण्याचा प्रयत्न केला. पण अजयने एकलांगी तोडून डंकी मारण्याचा प्रयत्न केला असताना शुभम सिदनाळने सवारी भरून एकेरी हाताचा कस चढवित पाचव्या मिनिटाला अजय वरणला असमान दाखविले.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक कंठीरवा केसरी, कामेश पाटील, कंग्राळी व करण दिल्ली ही लढत काँग्रेस युवा नेते मृणाल हेब्बाळकर, नागेश देसाईसह इतर मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत काही सेकंदातच कामेशने दुहेरीपट काढून दोन्ही हाताचे हप्ते भरून चित करण्याचा प्रयत्न करत असताना करण खालून डंकी मारण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी कामेशने उलटी मारून करणला चारीमुंड्या चित केले.
शिवा दड्डी व सत्पाल ही तिसऱ्या क्रमांकाची लढत परशराम बेडका, बसवराज मोदगेकर, मारूती मंदीर देवस्थान कमिटी व रेणूका देवस्थान कमिटी यांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत शिवा दड्डीने एकेरीपट काढून सत्पालला खाली घेतले. व घिस्सा मारण्याचा प्रयत्न केला. त्यातुन सत्पालने सुटका करून घेतली. चौथ्या मिनिटाला शिवाने एकेरीपट काढून सत्पालला खाली घेत नाकपट्टी लावून उलटी डावावरती चित करून उपस्थित कुस्ती शौकीनांकडून वाहवा मिळविली.
प्रेम कंग्राळी व शिवकुमार जंगम इस्लामपूर ही चौथ्या क्रमांकाची कुस्ती उद्योजक शिवराज जाधव, विक्रम सोनम व इतर मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. पहिल्याच मिनिटाला शिवकुमारने पुट्टी मारून प्रेमला खाली घेतले. शिवकुमारने प्रेमवर घुटना ठेवून घुटण्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण खालून डंकी मारून प्रेमने सुटका करून घेतली. पाचव्या मिनिटाला प्रेम जाधवने दुहेरीपट काढून शिवकुमारला खाली घेत मानेवरती मजबुत घुटना ठेवून चारीमुंड्या चित केले.
सचिन शिरगुप्पी व सौरभ मरकड सांगली यांच्यातील ही पाचव्या क्रमांकाची मेंढ्याच्या बक्षीससाठीची लढत डावप्रतिडावाने झुंजली. पण वेळेअभवी ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. कार्तिक व ओमकार राशीवडे यांच्यातील सहाव्या क्रमांकाची लढत ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. सातव्या क्रमांकाची मेंढा पुरस्कृत कुस्तीत रोहित सोनीपत आखाडा याने विनायक येळ्ळुरला आकडी लावून टांगेवरती चित करीत मेंढ्याचे बक्षिस पटकाविले. आठव्या क्रमांकाच्या लढतीत सतप्पा कोल्हापूरने भूमीपुत्र मुतगाला एकेरी कस लावून चित केले.
पंकज चापगाव व यल्लारलिंग ही नवव्या क्रमांकाची लढत बरोबरीत सोडविण्यात आली. दहाव्या क्रमांकाच्या लढतीत महेश तीर्थकुंडेने ध्रुव मण्णीकेरीचा छडीटांग डावावरती पराभव केला. अकराव्या क्रमांकाची हर्ष कंग्राळी व तुकाराम किणये तसेच बाराव्या क्रमांकाची सुपीयन सय्यद राशिवडे व परशराम निर्वानट्टी या लढती बरोबरीत राहिल्या. अन्य लढतीत भरत मुतगा, श्रीघाडी, दर्शन सांबरा, कृष्णा तीर्थकुंडे, नचिकेत रणकुंडे, श्री कंग्राळी, पृथ्वीराज औचारहट्टी, ज्ञानेश्वर हंगरगा आदी मल्लांनी आपल्या प्रतिस्पर्धावर मात करीत विजय मिळविला.
नवीन पाटील मुतगे, विश्वनाथ पाटील, कडोली, शिवाजी पाटील कडोली, गणपत बनवासी, सागर सादळे, मुकूंद मुतकेकर, भावकाण्णा पाटील, परशराम सागांवकर, हणमंत पाटील, गंगाराम बाळेकुंद्रेनी, उमेश मजूकर यांनी पंच म्हणून काम पाहिले. कुस्तीचे समालोचन कृष्णकांत चौगुले राशिवडे यांनी केले. तर ओंमकार निलगुडे यळगुड यांनी आपल्या हलगीच्या तालावर सर्व कुस्ती शौकीनांना खेळवून ठेवले. मैदान यशस्वी करण्यासाठी सांबरा कुस्ती संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
दर्शनला मदत
सांबऱ्याचा होतकरू व गरीब घराण्याचा मल्ल दर्शन हा स्वत: मोलमजुरी करून कुस्तीचा सराव करीत आहे. कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून उद्योजक शिवराज जाधव यांनी दर्शनला 25हजार रूपयांची मदत दिली. त्याच प्रमाणे इतर मान्यवरांनी दर्शनला मदत जाहीर केली.
Source link

