Uncategorized

वृद्धेवर खुनी हल्ला करणारा आठ तासात पोलिसांच्या जाळ्यात

वेंगुर्ले / प्रतिनिधी : वेंगुर्ले कॅम्प कातकरी समाज वस्ती येथील निलेश रमेश राठोड (वय २०) यांची आई शारदा राठोड (वय ६०) या आपल्या राहत्या झोपडीत झाडू मारत असताना, त्याच परिसरात राहणाऱ्या मूळ चिपळूण येथील ‘पबजी’ नामक व्यक्तीने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर, “थांब, तुझा जीवच घेतो,” अशी धमकी देत जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि छातीवर जोरदार वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. ही घटना रविवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली.

गंभीर जखमी झालेल्या शारदा राठोड यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांचा मुलगा निलेश राठोड हा कामानिमित्त कुडाळ येथे असल्याने त्याला घटनेची माहिती देऊन तात्काळ बोलावून घेण्यात आले. डोके व छातीला गंभीर दुखापत झाल्याने वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी गोवा येथील बांबोळी रुग्णालयात हलविले.

या घटनेप्रकरणी शारदा राठोड यांचा मुलगा निलेश रमेश राठोड यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार ‘पबजी’ नामक आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम १०९(१), ३५१(३) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली, वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड, पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, पोलीस हवालदार राम मळगांवकर, मनोज परुळेकर व जयेश सरमळकर यांच्या पथकाने अवघ्या आठ तासांत आरोपी ‘पबजी’ याला अटक केली.

या खुनी हल्ल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश सराफदार करीत आहेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​