‘हम सब एक है’चा नारा; पूनम गेट दणाणले! सोलापुरात 400 ते 500 कर्मचारी संपात सहभागी

सोलापूर: पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करावा, द्विपक्षीय करारातील मान्य तरतुदींची अंमलबजावणी करावी आणि कामगिरीशी निगडित प्रोत्साहनपर भत्त्यातील भेदभाव दूर करावा, या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. 11) देशभरातील बँक कर्मचारी एकदिवसीय संपावर गेले. सोलापुरातही या संपाला जोरदार प्रतिसाद मिळाला. शहर व जिल्ह्यातील विविध बँकांमधील सुमारे 400 ते 500 कर्मचारी संपात सहभागी झाले. यावेळी ‘हम सब एक है’, ‘जोर से बोल… हल्लाबोल’ अशा घोषणांनी पूनम गेट परिसर दणाणून गेला.
महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात आक्रमक भूमिका घेतली. हा संप केवळ पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करण्यापुरता मर्यादित नसून, द्विपक्षीय करारातील मान्य हक्क आणि तरतुदींच्या अंमलबजावणीसाठीचा संघर्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाच दिवसांचा बँकिंग आठवडा ही बँक कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. विविध द्विपक्षीय करारांमधून या मागणीला टप्प्याटप्प्याने सहमतीही मिळाली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आल्यानंतरही त्याची अंमलबजावणी लांबणीवर पडत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. ‘पाच दिवसांचा आठवडा झाल्यास कामाचे तास कमी होतील’ हा प्रचार दिशाभूल करणारा असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले. प्रस्तावित व्यवस्थेनुसार सोमवार ते शुक्रवार या कालावधीत कामकाजाच्या वेळेत वाढ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रोत्साहनपर भत्त्यातील दुहेरी निकष, बँकांमधील अपुरे मनुष्यबळ, वाढता कामाचा ताण आणि आउटसोर्सिंगच्या धोरणावरही कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास 28, 29 आणि 30 सप्टेंबर रोजी तीन दिवसांचा संप करण्यात येईल. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये बेमुदत संप पुकारण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे.
Source link



