‘विक्रम रालोआ कार्यकर्त्यांना समर्पित’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भावोत्कट वक्तव्य, पंडित नेहरु यांना टाकले मागे, जगभरातून प्रशंसा वर्षाव
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकनियुक्त नेते या नात्याने सलग 4 सहस्र 399 दिवसांचा कालावधी पूर्ण करत पंडित जवाहरलाल नेहरु यांना मागे टाकले आहे. हा एक नवा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला असून बुधवारी या निमित्त दिल्लीतील ‘भारत मंडपम्’ सभागृहात आयोजित एका भव्य कार्यक्रमात राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. केवळ भारतातूनच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांनी या विक्रमानिमित्त त्यांची प्रशंसा केली आहे. या अविस्मरणीय प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महत्वाचा संदेश दिला असून आपल्या या विक्रमाचे सर्व श्रेय त्यांनी भारताची जनता आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटकपक्षांच्या कार्यकर्त्यांना समर्पित केले आहे. देशाला अधिकाधिक समर्थ आणि सक्षम बनविणे, हा एकच ध्यास घेऊन आपण काम करीत आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरुंचा विक्रम मागे टाकल्यानिमित्त, दिल्लीत बुधवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या महसभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आघाडीतल्या सर्व घटकपक्षांचे प्रमुख नेते आणि प्रतिनिधी उपस्थित होते. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटकपक्षांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. तसेच, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, अनेक केंद्रीय मंत्री आणि मान्यवर यांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.
पंतप्रधान मोदी यांचे ओजस्वी भाषण
भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष यांनी केलेला हृद्य सत्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व उपस्थितांसमोर ओजस्वी आणि उद्बोधक भाषण केले. आपला विक्रम राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व कार्यकत्यांना आणि भारताच्या जनतेला समर्पित करतानाच त्यांनी गेल्या 12 वर्षांमध्ये देशाने केलेल्या प्रगतीचाही आढावा घेतला. अर्थव्यवस्था, उद्योग, ऊर्जा निर्मिती, पायाभूत सुविधा, हरित ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, संरक्षण आणि सामाजिक क्षेत्रात भारताने साध्य केलेल्या ध्येयांची त्यांनी अभिमानाने उजळणी केली. तसेच, भविष्यात भारत काय करणार आहे, याचीही एक वास्तविक रुपरेषा त्यांनी उपस्थितांसमोर मांडली आहे.
भविष्यात अधिक लाभ होणार
गेल्या 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारने विविध क्षेत्रात पायाभरणी करण्याचे काम केले आहे. या कामाचा लाभ आणखी काही वर्षांनी आपल्या नव्या पिढीला होणार आहे. ‘आत्मनिर्भर’ भारताचा पाया घालण्याचे काम आपल्या सरकारने गेल्या तपभरात निर्धाराने केले आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात भारतीय लोक भारतनिर्मित विमानाने प्रवास करु शकतील. विदेशांवरचे अवलंबित्व कमी केल्याखेरीज भारताची खरी प्रगती कधीच होणार नाही. ‘सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास’ या तत्वावर आम्ही काम करत आहोत, असा संदेश त्यांनी आपल्या भाषणात दिला.
जनतेचा आशीर्वाद सदैव पाठीशी
या 12 वर्षांच्या काळात आपल्या पाठीशी सदैव जनतेचा आशीर्वाद राहिला आहे. त्यामुळेच जनतेचे सेवा सलगरित्या करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली. आम्हीही जनतेच्या हितासाठीच अविश्रांत परिश्रम केले आहेत. आमच्या पूर्वी विकसीत भारताचे स्वप्न कोणत्याही राजकीय पक्षाने पाहिले नव्हते. ते आम्ही पहात आहोत. केवळ पहात आहोत असे नाही, तर त्या दिशेने आमची वेगवान वाटचाल होत आहे. हे ध्येय पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आज विकसीत भारताचे स्वप्न हे केवळ काही लोकांचे नाही, तर साऱ्या भारताचे स्वप्न बनले आहे. सारा भारत ते साध्य करण्यासाठी तन मन धन अर्पून कष्ट करण्यास उत्सुक झाला आहे. ध्येयपूर्ती होईलच, असा आत्मविश्वास आमच्यात जागृत झाला असून कोणीही आम्हाला अडवू शकत नाही, असे ओजस्वी विचार त्यांनी व्यक्त केले.
काँग्रेसवर टीका
आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवरही शरसंधान केले. काँग्रेसच्या आर्थिक धोरणांमुळे देशाचा विकास रोखला गेला. काँग्रेसच्या काळात देशाला त्याच्या क्षमतांची पूर्ण जाणीव करुन देण्यातच आली नाही. प्रारंभीच्या काळात भारताचा विकास दर अतिशय कमी होता. या कमी विकास दराला काँग्रेसकडूनच ‘हिंदू विकासदर‘ अशा शब्दांमध्ये हिणवले गेले. आपल्या चुकीच्या धोरणांमुळे विकास दर घटला हे मान्य करण्याऐवजी त्याचा संबंध ‘हिंदू’ या शब्दाशी जोडला गेला, अशा अर्थाची खोचक टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केली.
असा नेता हे भारताचे भाग्य
अत्यंत आव्हानात्मक काळात भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता मिळणे, हे भारताचे भाग्य आहे. मी त्यांना कधीही थकलेले पाहिलेले नाही, असे प्रशंसोद्गार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काढले आहेत. त्यांचीही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती होती. त्यांच्या प्रमाणेच भारतीय जनता पक्षाच्या इतर मुख्यमंत्र्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक कार्याची प्रशंसा केली.
एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ ंिशंदे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. त्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या विक्रमासाठी अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठाम निर्णय घेणारे नेते असून ते देशाच्या गौरवाचा मेरुमणी आहेत. ते देशाच्या 140 कोटी जनतेच्या आकांक्षांचे प्रतिनिधीत्व करतात. विकास आणि राष्ट्रीय सुरक्षा हीच त्यांची ध्येये आहेत, असे प्रशंसोद्गार त्यांनी यावेळी काढले. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.
अभिनंदनाचा प्रस्ताव संमत
राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून आयोजित या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महत्वाच्या विक्रमासाठी त्यांच्या सत्काराचा प्रस्ताव संमत करण्यात आला. हा प्रस्ताव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मांडला. त्याला सर्व उपस्थितांनी एकमुखी अनुमोदन दिले. नंतर प्रस्ताव सर्वसहमतीने संमत झाल्याची घोषणा करण्यात आली. हा कार्यक्रम अविस्मरणीय होता, अशी प्रतिक्रिया अनेक उपस्थित नेत्यांनी आणि मान्यवरांनी या कार्यक्रमानंतर व्यक्त केली आहे.
जगभरातून अभिनंदनाचे संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विक्रमाचे केवळ भारतातूनच नव्हे, तर जगभरातून कौतुक होत आहे. अमेरिकेच्या प्रशासनाने यासाठी विषेश संदेश पाठवून त्यांचे अभिनंदन केले. तर इटलीच्या नेत्या जॉर्जिया मेलोनी यांनीही संदेश पाठवून त्यांच्या नेतृत्व कौशल्याची आणि कार्यक्षमतेची वाखाणणी केली. इतर अनेक देशांच्या प्रमुखांनीही त्यांना अभिनंदनाचे संदेश पाठवून त्यांची प्रशंसा केली.
विकास हेच ध्येय, तोच ध्यास…
ड या 12 वर्षांमध्ये भारतात विविध पायाभूत सुविधांचा चहुमुखी विकास
ड महामार्ग, रेल्वेमार्ग, बंदरे, विमानतळ यांच्या संख्येत कित्येक पटींनी वाढ
ड कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रात मागे राहणे भारताला कधीही परवडण्यासारखे नाही
ड आत्मनिर्भरतेमुळेच भारताचा खऱ्या अर्थाने विकास केला जाऊ शकणार आहे
ड ईश्वराच्या कृपेमुळेच मला इतका प्रदीर्घ काळ देशसेवा करण्याची संधी प्राप्त
ड भारतात आता धोरण लकवा नाही. भारताचे जगात स्थान अभिमानास्पद
ड दीर्घकालीन विकासाचे ध्येय मनाशी धरुन आमची आजची धोरणनिश्चिती
ड स्थिर सरकारमुळे भारताच्या धोरणांनाही स्थिरता, त्यामुळे वेगाने विकास शक्य
ड आमच्या धोरणांमुळे महेला, युवावर्ग, समाजातील दुर्बल घटकांचे सबलीकरण
Source link



